फोटो सौजन्य: iStock
सावन वैश्य | नवी मुंबई : एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतील तुर्भे परिसरात जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान या जखमीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली असून, इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशुतोष मोहन धुर्वे (वय 31) यांनी एपीएमसी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना दिनांक 8 ऑक्टोबरच्या मध्यरात्री सुमारे 12.30 वाजता घडली. आरोपींमध्ये विकी पाटील, संकेत लाड, ओंकार वाघमारे, विकी पाटीलची पत्नी चारुशिला, विद्वेष घरत, शकील, मौला आणि अन्य तीन अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांनी एकत्र येऊन फिर्यादी व त्यांच्या मित्रांवर गंभीर हल्ला केला.
Raigad News: पोयनाड येथील भव्य रोजगार मेळावा, शेकडो तरुणांनी मिळवली रोजगाराची संधी
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपींनी जुन्या वादाचे कारण सांगत फिर्यादींना त्यांच्या घरी चर्चेसाठी बोलावले. मात्र वाद मिटविण्याऐवजी आरोपींनी हातात बॅट, फायबर रॉड आणि इतर घातक हत्यारे घेऊन फिर्यादी व त्याच्या मित्रांवर अचानक हल्ला चढवला. या दरम्यान किशोर वरड याच्या डोक्यावर बॅट आणि फायबर रॉडने हल्ला करून गंभीर दुखापत केली.
हल्ल्यानंतर किशोर वरड बेशुद्ध अवस्थेत कोसळला. त्याला तात्काळ वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत फिर्यादी आशुतोष धुर्वे यांच्या हातावरही बॅटने प्रहार करून फ्रॅक्चर झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद आहे.
हल्ल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या स्कूटीचे हँडल, स्पीडोमीटर आणि मागील भागाचे नुकसान केले. त्यामुळे मालमत्तेची हानी झाल्याचेही पोलिसांना कळविण्यात आले आहे.
घटनेनंतर एपीएमसी पोलिसांनी गंभीर मारहाण, दुखापत, मालमत्तेचे नुकसान आणि खून या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पथके तयार करून आरोपींच्या शोधाला सुरुवात केली. पोलिसांच्या कारवाईत विकी पाटील, संकेत लाड, ओंकार वाघमारे आणि विद्वेष घरत या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.इतर आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली असून पुढील तपास एपीएमसी पोलीस करत आहे.
या घटनेमुळे तुर्भे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे.