File Photo : Baba Siddique
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची काही महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणात गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील पेटलाड येथील रहिवासी असलेल्या सलमान इक्बाल वोहरा याला रविवारी अकोल्यातील बाळापूर उरळ पोलिस स्टेशन हद्दीतील लोहारा येथून अटक करण्यात आली. वोहरा याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुंबई गुन्हे शाखेने अटक केली.
संबंधित बातम्या : Baba Siddique case: असा रचला होता बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा कट; तपासात मोठी माहिती समोर
आरोपी वोहरा याने संबंधित इतरांना आर्थिक मदत केली असल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील पेटलाड येथील रहिवासी असलेल्या सलमान इक्बाल वोहरा हा आपल्या सासूच्या अंत्यविधीकरिता अकोल्यातील लोहारा येथे आल्याचा सुगावा पोलिसांना लागला. पोलिस त्याच्या मागावर आले.
दरम्यान, स्थानिक पोलिसांच्या मदतीने वोहरा याला रात्री 2 वाजता अटक करून मुंबईला नेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 66 वर्षीय राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात आत्तापर्यंत 25 जणांना अटक झाली आहे.
दिवसेंदिवस होताहेत नवनवीन खुलासे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी दिवसेंदिवस नवनवे खुलासे समोर येत आहेत. बाबा सिद्धीकी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडून सुरू आहे. या तपासात काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर शूटर शिवकुमार गौतम तब्बल अर्धा तास हॉस्पीटलबाहेर उभा होता. धक्कादायक म्हणजे, ज्या दिवशी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. त्याच्या 10 दिवसांनीच बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. ही माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
सलमान खानच्या घरावर गोळीबार
अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर 10 दिवसांनंतरच लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा कट रचला होता. तत्पूर्वी सलमानच्या घरावर 14 एप्रिल 2024 रोजी गोळीबार झाला होता. सलमान खानला मारण्याचा प्लॅन होता. पण तो प्लॅन अयशस्वी झाल्याने बिश्नोई गँगने त्याच्या घरावर गोळीबार करत त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सलनान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास सुरू झाला.
संबंधित बातम्या : Baba Siddiqui Case : शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता, शूटर शिवाच्या चौकशीत खुलासा