फोटो - सोशल मीडिया
वाई : वाई, पाचगणी आणि महाबळेश्वरला फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रातील पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी येत असतात. पण या ठिकाणी असा एक गुन्हेगार होता जो आलेल्या पर्यटकांनाच लुटत होता. पर्यटकांचं सोनं हा गुन्हेगारल लंपास करत होता. तसेच गाड्या देखील पळवत होता. पाचगणी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करीत दुचाकी चोरणारा अट्टल गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल पाच लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की १० सप्टेंबर रोजी छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात लक्ष्मी स्टोअरसमोर लावलेली गॅबरेल फ्रांसीस जोसेफ यांच्या मालकीची अंदाजे पन्नास हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची प्लेझर मोटर सायकल तसेच अविराम मेडिकल समोर एकनाथ काशिनाथ पवार रा. खिंगर यांची अंदाजे 40 हजार रुपये किंमतीची हिरोहोंडा कंपनीची सिडी डॉन मोटर सायकल ही अज्ञात चोरट्याने चोरून नेलेबाबत पाचगणी पोलीस ठाणेत तक्रार दाखल झाली होती. या दोन गाड्या चोरणारा चोरटा आरोपी प्रीतम सुनिल शिंदे (वय ३० रा. दामले आळी, गंगापुरी वाई ) यास वरील गुन्ह्यातील दोन्ही मोटर सायकल असा एकुण 90 हजार रूपयाचा माल हस्तगत केला आहे. त्याच्यावर कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याच पद्धतीने 12 सप्टेंबर रोजी पाचगणी येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले पर्यटक इंदुबेन जगदीश ठक्कर (रा. कांदीवली मुंबई) यांचे रूममधुन सत्तर हजार रुपये किमतीच्या हिरेजडीत सोन्याच्या दोन अंगठ्या चोरीस गेल्या होत्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासाच्या आत गुन्हयातील आरोपी माधव केशव लटपटे (वय २० रा. कोदरी ता. गंगाखेड जि. परभणी) यास अटक करून त्याच्याकडून गुन्हयात गेलेल्या दोन्ही हिरेजडीत अंगठया असा एकुण सत्तर हजार रुपये किंमतीचा माल हस्तगत केला. त्याचेवर कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये पाचगणी परिसरातून गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध लागण्याकरीता विशेष प्रयत्न करून गहाळ झालेल्या मोबाईलपैकी ३५ मोबाईलचा शोध लावुन संबंधीतांना त्यांचे मोबाईल देण्यात आले आहेत. गुन्हयाच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उप विभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे व केलेल्या मार्गदर्शनावरून पाचगणी पोलीस ठाणेचे सपोनी दिलीप पवार पोलीस उप निरीक्षक बालाजी सोनूने, तपासी अंमलदार पो. हवालदार श्रीकांत कांबळे, पोलीस नाईक तानाजी शिंदे, पोलीस हवालदार विनोद पवार ,उमेश लोखंडे, अमोल जगताप यांनी या सर्व आरोपींना शोधण्यात यश मिळवले.