मिळालेल्या माहितीनुसार, अतिक्रमण विभागाचे कंट्री घेणारे दशरथ सुरवसे या कंत्राटदाराकडून ही लाच गायकवाड यांनी मागितली होती. ऐरोली विभागात 15 नोव्हेंबर 2024 ते 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीत अतिक्रमण हटविण्याची कामे सुरवसे यांनी केली होती. कंत्राटदाराचे या कामाचे बिल पालिकेत अडकले होते. ते बिल मिळविण्यासाठी त्यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला असता, संबंधित बिल मंजूर करून देण्यासाठी, फाईलवर सही करण्यासाठीअतिक्रमण विभागाचे उपायुक्त गायकवाड यांनी 42 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप सुरवसे यांनी केला. आधीच बिल मिळत नसल्याने व लाचेची मागणी केल्याने त्रस्त झालेल्या कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर मंगळवारी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नवी मुंबई विभागाचे पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचला. त्यानुसार, महापालिकेच्या गायकवाड यांच्या केबिन बाहेर सापळा रचण्यात आला. गायकवाड यांनी लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.
या घटनेनंतर महापालिकेतील खालपासून वरपर्यंत पोहोचलेला भ्रष्टाचार अधोरेखित झाला आहे. तक्रारदार दशरथ सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षभराच्या कामाचे एकूण दीड कोटींचे बिल थकीत होते. त्यापैकी 21 लाखांचे बिल घेण्यासाठी म्हणून सुरवसे गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करत होते. त्यापैकी 21लाखांचे 2 टक्के रक्कम लाच स्वरूपात मागीतल्याची माहिती सुरवसे यांनी दिले. या प्रकरणाचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असून, यात इतर कोणाचा सहभाग आहे का याचीही चौकशी केली जात आहे. महापालिका प्रशासनाकडूनही या घटनेची स्वतंत्र चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गायकवाड हे पेशाने डॉक्टर होते. तसेच ते साहित्यिक्त देखील होते. अशा अधिकाऱ्यास अटक झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.






