पुण्यात पादचाऱ्यांना लुटण्याचे सत्र सुरूच (फोटो- टीम नवराष्ट्र/istockphoto )
पुणे/अक्षय फाटक: पीएमपीएल बस ही पुणेकरांच्या रोजच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे. लाखों पुणेकर रोज याने प्रवास करतात. पुणेकरांची “जीवनवाहिनी” असलेली पीएमटी अन् त्याचे बस थांबे सध्या चोरट्यांचे अड्डे झाल्याचे वास्तव आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा चैन स्नॅचर टोळ्यांनी उचलखाली असून, बसमधील आणि थांब्यावरील गर्दीत महिला व ज्येष्ठांना टार्गेटकरून त्यांच्याकडील मोबाईल व दागिने चोरून नेत असल्याच्या धक्कादायक घटना घडत आहेत. गेल्या ११ महिन्यांमध्ये तब्बल ६६ घटना घडल्या आहेत. त्यातील केवळ १३ घटना उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. जंगजंग पछाडून देखील पोलिसांना या घटना रोखता येत नसल्याचे दिसत आहे. तर, चोरट्यांचाही थांगपत्ता लागत नसल्याचे पाहिला मिळत आहे.
शहरात गर्दीत चोऱ्या करणाऱ्या तसेच पादचारी महिला आणि नागरिकांना लुटणाऱ्या चोरट्यांनी काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. दररोज दोन ते तीन घटना सरासरी घडता आहेत. त्यातही स्वारगेट बस स्थानक व शहरातील गर्दी असणारे पीएमपीचे थांबे हे चोरट्यांचे अड्डे झाल्याचे दिसत आहे. पीएमपी बसमध्ये चढत असताना आणि प्रवासात गर्दीत हे चोरटे महिलांच्या गळ्यातील, बॅगेतील तसेच हातातील सोन्याचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरून पोबारा करत आहेत.
पीएमटी बसला सकाळी आणि सायंकाळी मोठी गर्दी असते. कार्यालये, ऑफिस तसेच शाळा व महाविद्यालये सुटल्यानंतर अनेकजन पीएमटीने प्रवास करतात. तेव्हा मोठी गर्दी असते. या गर्दीत चोरटे “मिक्स” होतात. गर्दीत धक्काबुक्की व ढकला-ढकलीचा प्रसंग होत असतो. तीच संधी साधत चोरटे हेरून दागिन्यांवर व मोबाईल डल्ला मारत असल्याचे दिसत आहे. सातत्याने त्याच परिसरात घटना होऊन देखील पोलिसांना या चोरट्यांचा माग निघत नसल्याने नेमकी पोलिसांची गस्त असते कोठे असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
हेही वाचा: Pune Crime News: येरवड्यात तरूणाला कोयत्याचा धाक दाखवला अन्…; आरोपींचा शोध सुरू
विशेष करून या घटना स्वारगेट बस स्थानक तसेच विमानतळचा परिसर आणि हडपसर भागात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निरीक्षण आहे. आकडेवारीवरून देखील या घटना या भागात मोठ्या प्रमाणात घडल्याचे दिसत आहे. शहरात पादचाऱ्यांना लक्षकरून दुचाकीस्वार चोरटे त्यांच्याकडील चैन स्नॅचिंग तसेच मोबाईल हिसकावणारे देखील घटना मोठ्या प्रमाणात घडत असून, ११ महिन्यात तब्बल १६७ घटना घडल्या असून, त्यातील ७१ घटना उघडकीस आल्या आहेत.
गेल्या ११ महिन्यातील बसमधील घटना
दागिने चोरी—
३२ घटना– उघड २
मोबाईल चोरी—
३४ घटना– उघड ११
सर्वाधिक घटना या परिमंडळ दोन व परिमंडळ चारमधील असल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. परिमंडळ दोनमध्ये दागिने चोरीच्या ७ तर मोबाईल चोरीच्या १५ घटना घडल्या आहेत.
चैन स्नॅचिंगच्या १६७ घटना
चैन स्नॅचिंग– ८७ घटना, उघड–२६
मोबाईल स्नॅचिंग– ८० घटना, उघड– ४५