सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : आंबेगाव बुद्रुक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित स्मारक असलेल्या शिवसृष्टी बाहेरील सूचना फलकावर लघुशंका केल्याप्रकरणात अटकेत असलेल्या दाम्पत्याची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शनिवारी (दि.३१) पहाटे हा प्रकार घडला होता. याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या कृत्यामुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
अमोल अरुण कुलकर्णी (वय ५९, रा. धायरी) आणि त्यांची पत्नी स्नेहा अमोल कुलकर्णी (वय ५७) अशी पोलीस कोठडी सुनावलेल्याचे नावे आहेत. याबाबत नयनाथ तुकाराम अमराळे (वय २३) यांनी तक्रार दिली आहे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. अमोल हे सरकारी सेवेतून निवृत्त झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, तक्रारदार अमराळे हे त्यांच्या मित्रासह नवले ब्रिजहून निघाले होते. ते शिवसृष्टीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून जात असताना तेथे दोन चारचाकी वाहने उभी असल्याचे त्यांना दिसले. त्यातील एका गाडीशेजारी एक वयोवृद्ध पुरुष थेट सूचना फलकावर लघुशंका करत होते. तर त्यांच्यासोबत एक महिला शेजारी उभी होती. त्यांनी याबाबत विचारणा केल्यानंतर संबंधितांनी आपली ओळख सांगितली. हा सर्व प्रकार अमराळे यांनी मोबाइलमध्ये शूट केला. नंतर याची माहिती पोलिसांना दिली.
भारती विद्यापीठ पोलिसांनी अमोल कुलकर्णी यांच्यासह पत्नीला अटक केली. अमोल दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक शक्यता वर्तविली आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी दाम्पत्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संबंधीत दाम्पत्यांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोघांनाही अटक केली असून त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
– सावळाराम साळगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे.