भाजपा विरुद्ध भाजपा लढत रंगली (संग्रहित फोटो)
पुणे : भारतीय जनता पक्षाचे खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. तो मद्य पिला होता. मद्य पिऊन तो त्यांच्या घरात घुसण्याच्या प्रयत्नात असताना येथील सुरक्षा रक्षकांनी त्याला अडविल्यानंतर त्याने गोंधळ घातला.
शंकर सर्जेराव धुमाळ (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांत मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ८५(१) भारतीय दंड संहिता कलम ३५२ (उपद्रव करणे), ३५१(२)(३) (आक्रमणाची धमकी), १३२ (सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला), ३३३ (कर्तव्य बजावत असलेल्या लोकसेवकाला दुखापत करणे), पोलीस (अप्रीतीची भावना चेतवणे) अधिनियम, १९२२ अंतर्गत कलम ३ या कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
भाजप आमदार भीमराव तापकीर यांचे धनकवडी परिसरात घर आहे. बुधवारी शंकर धुमाळ हा मद्य पिलेला असताना त्यांच्या घराजवळ आला. तो त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा सुरक्षा कर्मचारी अजित देवघरे यांनी त्याला अडविले. पण, त्याने गोंधळ घातला. तसेच, ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. दरम्यान, तो वारंवार तापकीर यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालत होता. त्याने तीन वेळा घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. रोखण्याचा प्रयत्न केला असता तो पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी देत होता.
सतत होणाऱ्या याप्रकारामुळे आमदार व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे शेवटी बुधवारी सहकारनगर पोलिसांत तक्रार देण्यात आली. या प्रकरणात सुरुवातीला आरोपीवर किरकोळ कारवाई केली होती. मात्र नंतरही तो पुन्हा- पुन्हा येत राहिला व शिवीगाळ करत धमक्या देत होता. यामुळे आमदारांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची मागणी केली. नंतर पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी संपूर्ण प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शंकर धुमाळ याला अटक केली.