संग्रहित फोटो
उंब्रज : एसटीला दुचाकी आडवी मारत एसटी चालकास कुऱ्हाडीसह सत्तुराचा धाक दाखवून तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी एकाने दिली होती. ५ मार्च २०२५ रोजी उंब्रज (ता. कराड) येथे ही घटना घडली आहे. अवघ्या एका तासात सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन एसटीचालकास धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. राहुल मोहन आटोळे (वय २४ रा. उंब्र, ता. कराड जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मनोज अशोकराव पाटील (वय ३८, रा. ढेबेवाडी, ता. पाटण) यांनी पाटण ते सातारा एसटी उंब्रजसेवा रस्त्या लगत प्रवासी उतरवण्यासाठी ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता थांबवली. यावेळी संशयित राहूल आटोळे हा वेगाने दुचाकी घेऊन तिथे आला. त्याने त्याची दुचाकी एसटीला आडवी लावून तो कुऱ्हाड व सत्तुर घेऊन चालकाच्या दिशेने धावला. तु एसटी पुढे न्यायची नाही. एसटी पुढे नेली तर तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत कुऱ्हाड व चाकुचा धाक दाखवला. सुमारे १५ मिनिटे हा प्रकार भररस्त्यात सुरू होता.
उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे पोलीस पथकासह घटनास्थळाकडे रवाना झाले, मात्र तोपर्यंत संशयित पसार झाला होता. भोरे यांनी घटनास्थळावर माहिती घेऊन मनोज पाटील यांना तत्काळ पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले. भोरे यांनी स्वतः संशयिताच्या तपासासाठी रवाना होत अन्य दोन पथके रवाना केली. यामधे पोलीस उपनिरीक्षक खबाले, कॉन्स्टेबल संजय धुमाळ, हवालदार पवार, श्रीधर माने, राजकुमार कोळी यांचा सहभाग होता. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या एका तासांच्या आत संशयिताला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या मुसक्या आवळत त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई केली. कायद्याचे उल्लंघन करून धाक दाखविणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, कडक कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी दिला आहे.