संग्रहित फोटो
पुणे : वाघोली-लोहगाव रस्त्यावर गांजा विक्री करणाऱ्या एकाला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी आठ किलो ४०२ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. सुरेश साहेबराव पाटील (वय ४४, रा. हिसाळे, ता. शिरपूर, जि. धुळे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपायुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज हांडे, सहायक निरीक्षक विनायक अहिरे, उपनिरीक्षक मनोज बागल यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
वाघोली-लोहगाव रस्त्यावर पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी पाटील गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून पाटील याला पकडले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत गांजा सापडला. जप्त केलेल्या गांजाची किंमत १ लाख ६९ हजार ३४० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाटील याला न्यायालायने २ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पाटील गांजा कोणाला विकणार होता तसेच त्याने कोणाकडून गांजा आणला, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा : मित्रांनीच केला मित्राचा घात; वाहत्या पाण्यात टाकले अन्…