सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुगलवरून व्यावसायिक कार्यालयांचे पत्ते शोधून, ठाण्यातून बस-रिक्षा वापरून पिंपरी-चिंचवड शहरात चोरी करण्यासाठी येणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट ४ ने अटक केली आहे. सलीम सिकंदर शेख (वय.५८) आणि अजित अर्जुन पिलई (वय.४२, दोघेही रा.वांगणी गोरेगाव, ठाणे) अशी आरोपींची नावे आहेत. हे आरोपी चोरी करताना मोबाईल फोन बंद ठेवत असत, जेणेकरून त्यांचा मागोवा घेता येऊ नये. त्यांच्याकडून २ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल रोजी काळेवाडीतील कोकणे चौकात पाचव्या मजल्यावरील एका व्यावसायिक कार्यालयात चोरी झाली होती. येथून ३६ हजार रुपये चोरीस गेले होते. या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने तब्बल ४०० सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले आणि आरोपींपर्यंत पोहोचले. यानंतर २० एप्रिल रोजी रात्री काळेवाडीत दोघे संशयित पायी फिरताना दिसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय गवारे, आदिनाथ मिसाळ, प्रवीण दळे यांच्यासह पथकातील विविध अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या ही कामगिरी पार पाडली.
दोन्ही आरोपी अट्टल गुन्हेगार
या घरफोडीसंदर्भात अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यामधील सलीम शेख याच्यावर मुंबईत ६२ घरफोडीचे गुन्हे नोंद असून १० नॉन बेलेबल वॉरंटही प्रलंबित आहेत. तर अजित पिलई याच्यावर २० गुन्हे दाखल असून तो उच्च शिक्षित आहे. तो गुगलवरून टार्गेट निवडत असे.