सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुण्यात अमली पदार्थांची आवक सुरूच असून, तस्कारांकडून सातत्याने अमली पदार्थांसाठा पुण्यात आणून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न होत आहे. पोलिसांकडून काही तस्कारांना पकडण्यात यश येत असले तरी यामधून पुण्यातील ड्रग्जची तस्करी सुरूच असल्याचे दिसत आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक दोन व गुन्हे शाखेच्या युनिट सहाने वाघोलीत मोठी कारवाई केली आहे. तब्बल ७६ लाखांचे मेफेड्रॉन जप्त केले आहे. येथून ३५१ ग्रॅम ५०२ मिलीग्रॅम एमडी हा ड्रग्ज जप्त केला आहे.
रामेश्वरलाल मोतीजी आहिर (४५) आणि नक्षत्र हेमराज अहिर (२५, दोघेही (रा. अहिल मोहल्ला, पोस्ट लोठीयाना, चित्तोडगड, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलिस निरीखक वाहीद पठाण, पोलिस अमंलदार कानिफनाथ कारखेले यांच्या पथकाने केली आहे. दोन्ही तस्कर राजस्थान येथून आले असल्याचे समोर आले आहे.
पुणे शहरातील अमली पदार्थ तस्कारांवर पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे. यादरम्यान, गुन्हे शाखेला वाघोलीत दोन तस्करांबाबत माहिती मिळाली. त्यानूसार, येथील बकोरीमधील तांबे वस्तील येथील गुलमोहर पार्कच्या मागे सापळा कारवाई करून पथकाने या दोघांना पकडले. या दोघांकडून ३५१ ग्रॅम ५०२ मिलीग्रॅम एमडी हा ड्रग्ज पकडला. १५ ऑगस्ट रोजी रात्रीच्या अंधारात ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपींकडे असलेल्या स्वीफ्ट कारमधून ह्या अमली पदार्थाची तस्करी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
चार वर्षात 705 ड्रग्ज पेडलर जेरबंद
सांस्कृतिक आणि शिक्षणाच्या नगरीला गालबोट लावत बदनामी आणि शहराचे स्वस्थ बिघडवणाऱ्या नाईट लाईफ, पब व हायप्रोफाईल पार्ट्यांवर पुणे पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू आहे. गेल्या चार वर्षात पुणे पोलिसांनी पुण्यात ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या तब्बल ७०५ पेडलरांना दणका देत त्यांना जेरबंद केले आहे. कारवाईचा जोर वाढविला असला तरी पुण्यात कोकेन तसेच एमडी आणि गांजा या ड्रग्जचा पुरवठा येत असल्याचेच काही प्रकरणांवरून दिसत आहे. यातही गांजाची पाळेमुळे चांगली रोवली गेल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन ते चार वर्षात ड्रग्ज पार्ट्यांमुळे तसेच उत्पादन व विक्रीमुळे पुणे चर्चेत राहत आहे. पबमधील पार्ट्यांत सहज उपलब्ध होत असलेला ड्रग्ज रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. नोकरदार तरुणाई, उच्चभ्रू पोलिसांच्या पब कारवाईनंतर हाऊस पार्टीवर भर देऊ लागले आहेत. हे प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. पण, यामुळे पुण्याचे स्वास्थ बिघडत चालले आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अशा पार्ट्यांसोबतच ‘पेडलर’ यांच्यावर कारवाईचा धडाका सुरू केला आहे.