संग्रहित फोटो
पुणे : पुण्यात गुन्हेगारी वाढत चालली असून, गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भवानी पेठेतील मंजुळाबाई चाळीत टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
जयेश सिद्धार्थ सोनवणे (वय २१), रितेश सिद्धार्थ सोनवणे (वय २३, दोघे रा. एसआरए वसाहत, मंजुळाबाई चाळ, भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ५ जणांसह अल्पवयीनांवर समर्थ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या आरोपींचा शो्ध घेण्यात येत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार मंजुळाबाई चाळ भागातील एसआरए वसाहतीत राहायला आहेत. १८ जुलै रोजी मंजुळबाई चाळीत रात्री साडेदहाच्या सुमारास टोळक्याने दहशत माजविली. आरोपी सोनवणे आणि साथीदारांनी नागरिकांना शिवीगाळ केली. एसआरए वसाहतीच्या तळमजल्यावर लावलेल्या दुचाकी, तसेच रिक्षाची दांडक्याने तोडफोड केली. वसाहतीतील महिलांनी आरोपी साेनवणे आणि साथीदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी्ंनी वसाहतीतील महिलांना शिवीगाळ करुन मारहाणीची धमकी दिली. दहशत माजवून पसार झालेल्या आरोपी सोनवणे यांना अटक केली. पसार झालेल्या साथीदारांचा शोध सूरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कुल्लाळ अधिक तपास करत आहेत.
लोखंडी हत्याराने सपासप वार करून तरुणाला संपवल
कानाखाली मारल्याच्या रागातून १९ वर्षीय तरुणाचा लोखंडी धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना आंबेगाव पठार भागात घडली आहे. खून करून पसार झालेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. धैर्यशील उर्फ सचिन बळीराम मोरे (२३, रा. तीन हत्ती चौक, आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, खून झालेल्या तरुणाचे नाव आर्यन उर्फ निखील अशोक सावळे (१९) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी धैर्यशील आणि आर्यन यांच्यात पूर्वीपासून ओळख होती. ११ जुलै रोजी त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्यावेळी आर्यनने धैर्यशीलच्या कानाखाली मारले होते. त्याच रागातून आरोपीने आर्यनवर लोखंडी धारदार हत्याराने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत आर्यनला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. खून झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपी धैर्यशील मोरे याचा शोध घेतला. त्यानुसार, आंबेगाव पठार येथील चिंतामणी शाळेसमोरून आरोपीचा पाठलाग करून त्याला अटक करण्यात आली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, ‘कानशिलात मारल्याचा राग मनात धरला होता,’ असे त्याने सांगितले.