संग्रहित फोटो
पुणे : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेदिवस वाढत आहेत. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पवना धरणाच्या ठाकुरसाई रस्त्यावरून पायी निघालेल्या एकट्या महिलेला दुचाकीवर आलेल्या अनोळखी इसमाने तिला निर्जन भागात नेऊन बळजबरीने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अवघ्या २४ तासात त्या आरोपीला स्केचवरून शोधत बेड्या ठोकल्या आहेत. ही धक्कादायक घटना १५ जुलै रोजी भरदुपारी घडली होती. पावसामुळे रोडवर कोणी नसल्याचा फायदा घेऊन या आरोपीने हे अमानुष कृत्य केले.
बाळू दत्तु शिर्के (रा. जिवन नं. ०१, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला एका डोंगरी भागात राहते. पावसात छत्री घेऊन रस्त्याच्या कडेला एकटी जात होती. तेव्हा आरोपीने ती एकटी असल्याचा गैरफायदा घेतला. तिचा पाठलाग केला. पुढे गाडी आडवी लावून तिला शेताच्या बांधाजवळील झुडपात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. महिलेनं जीवाच्या आकांताने आरडाओरड केली, पण पावसामुळे कोणीही आसपास नव्हते. या कृत्यानंतर आरोपी पळाला. घाबरलेली महिला आपल्या पतीकडे गेली. पण दुर्दैवाने त्याने तिच्यावरच संशय घेतला आणि घराबाहेर काढले. नाइलाजाने ती आईकडे गेली आणि घटनेची माहिती दिली. नंतर १६ जुलै रोजी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली. तातडीने गुन्हा नोंद केला.
स्केचवरून आरोपी जाळ्यात
पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपासाच्या सूचना दिल्या. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि लोणावळा ग्रामीणचे निरीक्षक दिनेश तायडे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपास पथके तयार केली. पीडितेच्या मदतीने संशयिताचे रेखाचित्र तयार केले. या चित्राची मदत घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांच्या पथकांनी जंगजंग पछाडत गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बाळू याला अटक केली. याप्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक करून तत्परतेचे उदाहरण घडवले आहे.
अल्पवयीन मुलाची तेरा वर्षाच्या मुलीला धमकी
अल्पवयीन मुलांकडून गंभीर गुन्हे घडत असतानाच एका पंधरा वर्षाच्या मुलाने तेरा वर्षाच्या मुलीला ‘प्रपोज’ केले. पण, तिने नकार दिल्यानंतर त्या मुलाने थेट खुनाची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच, त्याने तिच्यासोबत गैरवर्तनही केले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मुंढवा पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मे २०२५ पासून घडत असून, १३ वर्षीय मुलीचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.