संग्रहित फोटो
अयोध्या कॉलनी येथील विमलादेवी केशरवाणी यांच्या बंगल्यात कोणीच नसल्याची संधी साधत धाडसी चोरी करण्यात आल्याचे शनिवारी उघडकीस आले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनसह तांत्रिक तपासाच्या माध्यमातून सराईत चोरटा आकाश देशिंगे याला शहापुरातून व त्याचा साथीदार मनोज वाघमोरे याला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. दोघेही मजुरीचे काम करत असून, वाघमोरे हा संशयित काही वर्षांपूर्वी इचलकरंजीतच व काही दिवसांपूर्वी शहापुरात वास्तव्यास होता. याच दरम्यान दोघांनी कट रचल्याची माहिती समोर आली आहे. तरी चोरी करण्यापूर्वी त्यांनी एकवेळी या बंगल्याची रेकीही केल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरीच्या घटनेनंतर वाघमोरे हा पोलिसांना चकवा देत छत्रपती संभाजीनगर येथे गेला होता. तेथे जाऊन मोठ्या प्रयासाने त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
घरातच मिळाले दागिने
आकाश देशिंगे याच्यावर यापूर्वीही चोरीचा गुन्हा दाखल आहे. अयोध्या कॉलनीतील चोरीनंतर दोघांनीही लुटलेल्या दागिन्यांची वाटणी केली होती. आणि वाटणीला आलेले दागिने दोघांनीही आपापल्या घरात ठेवले होते. हे दागिने पोलिसांच्या हाती लागले असून, काही दिवसात या दागिन्यांची विक्री करण्याच्या तयारीत दोघे होते, अशी माहिती मिळाली आहे.






