संग्रहित फोटो
बारामती : देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, धमक्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे. अशातच आता बारामतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘आम्ही ठोकत नाही ओ, मी तोडतो… माझा पॅटर्नच वेगळा आहे’ असा दहशत व धमकीपूर्ण मजकूर असलेला व्हिडिओ आणि त्याला ‘सरकार नो कॉम्प्रोमाइज’ असे कॅप्शन देऊन इन्स्टाग्रामवर पोस्ट करणाऱ्या तरुणावर बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
श्रीकांत अर्जन घुले (वय २५, रा. ढेकळवाडी, ता. बारामती) असे या तरुणाचे नाव असून, त्याने दिनांक १८ ऑक्टोबर रोजी आपल्या इन्स्टाग्राम आयडीवर हा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओतून समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.
सदर व्हिडिओ ‘सरकार ग्रूप’ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड करण्यात आला होता. या ग्रुपद्वारे दहशत व दादागिरीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील आणि पोलीस हवालदार राजू बन्ने यांनी खातरजमा केली. त्यानंतर बन्ने यांच्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, पोलीस हवालदार राजेश बन्ने यांनी सहभाग नोंदविला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार किशोर वीर करीत आहेत.
दादागिरी चालणार नाही
“कोणाचीही दहशत किंवा दादागिरी चालणार नाही. बारामती तालुका पोलिसांच्या हद्दीतील कोणत्याही गावात, एमआयडीसी किंवा सूर्यनगरी परिसरात अशा प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती दिसल्यास तात्काळ ९९२३६३०६५२ या क्रमांकावर कळवावे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.” असे पोलिसांनी सांगितले.