सौजन्य - सोशल मि़डीया
याप्रकरणी पोलिसांनी कारखाना मालक अमित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय २५, रा. थेऊर), कामगार रामप्रसाद उर्फ बापू बसंता प्रजापती (वय ५०), अप्पु सुशिल सोनकर (वय ४६) व दानिश मुसाकीन खान (वय १८) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर यातील अमितचा भाऊ सुमित गुप्ता हा पसार झाला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड व त्यांच्या पथकाने केली आहे.
राज्यात गुटखाबंदी आहे. पण, तरीही शहरात खुलेआम आरएमडी, विमल यासह इतर गुटखा विक्री केली जाते. हा गुटखा बाहेर राज्यातून महाराष्ट्रात आणि पुण्यात येतो. तरीही पोलिसांना तो रोखता येत नाही. दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुटख्यावर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. यादरम्यान, अमली पदार्थ विरोधी पथक दोनला थेऊर फाटा येथील कांबळे वस्ती परिसरात गुटख्याचे गोडाऊन असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने याठिकाणी छापा कारवाई केली. तेव्हा याठिकाणी कच्चा माल तसेच इतर साहित्य देखील मिळाले.
गोडाऊनच्या बाजूलाच शेतात बनावट गुटखा तयार करण्यासाठीचा मोठ्या प्रमाणातील कच्चा माल देखील पोलिसांना मिळाला. याठिकाणी पोलिसांना चौघे मिळाले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. पण, सुमित गुप्ता पसार झाला. सुमित तसेच अमित हे गोडाऊनचे मालक आहेत. त्यांनी हा कारखाना सुरू केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, याठिकाणी माल वाहतूकीसाठी असलेले वाहन देखील मिळाले आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.






