सौजन्य - सोशल मिडीया
फलटण : राज्यात गांजा तस्करीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गांजा तस्करीवर कारवाई करण्यासाठी पोलिसही अलर्ट झालेले आहेत. अशातचं आता फलटणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. साखरवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत गांजाची वाहतूक करणाऱ्या संशयितांनी पोलिसाला फरफटत नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या झटापटीत संशयित पळून जात असताना त्याची कार झाडाला धडकली. यानंतर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत साडेपाच लाखांचा साडेदहा किलो गांजा जप्त केला आहे.
लक्ष्मण रामू जाधव (वय ६०, रा. पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व रणजित लक्ष्मण जाधव अशी संशयितांची नावे आहेत. यातील लक्ष्मण जाधव याला ताब्यात घेतले आहे. संशयितांवर यापूर्वी गांजाची वाहतूक केल्याप्रकरणी म्हसवड, लोणंद व माळशिरस पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.
एका कारमधून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यानूसार संबंधित कार सुरवडीतून साखरवाडीत गेल्यानंतर पोलिसांनी थांबवली. पोलिस संशयितांकडे तपासणी करत असताना दोघांपैकी एका संशयिताने कारचा दरवाजा ओढला तर चालकाने वाहन सुरू केले. यामध्ये एका पोलिसाचा हात कारच्या दारात सापडला. तरीही संशयितांनी पोलिसाला फरफटत नेले.
यादरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडाला धडकली. यानंतर चालक पसार झाला. तर दुसऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक सुनील महाडीक, पोलीस हवालदार नितीन चतुरे, तात्या कदम, अमोल जगदाळे, हनुमंत दडस, वैभव सूर्यवंशी, अमोल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पोना अमोल पवार, अमोल देशमुख यांनी ही कारवाई केली.