संग्रहित फोटो
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचे उदाहरण घडले असून, एका सहाय्यक फौजदारासह अन्य चौघांनी मोक्याची कारवाई रद्द करण्यासाठी तब्बल ६५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागताच हा पोलीस पसार झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील १३ सराईत गुन्हेगारांवरील मोक्काची कारवाई रद्द करण्यासाठी ६५ लाखांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांवर अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात कोल्हापूर पोलिस मुख्यालयातील एका सहायक फौजदारासह हुपरीतील एका तरुणाचा समावेश आहे.
समीर अब्बास पानारी (३५, रा. महावीरनगर, हुपरी, ता. हातकणंगले), सतीश रामदास सावंत (५०, रा. उपळावी बुद्रुक, ता. माढा, जि. सोलापूर), सहाय्यक फौजदार मिलींद बळवंत नलावडे (पोलिस मुख्यालय, कोल्हापूर), कमलेश रमेश कानडे (रा. लालबाग, मुंबई) आणि लाला उर्फ लालासाहेब ज्ञानेश्वर अडगळे (रा. अकलूज) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत.
अकलूज परिसरातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव कोल्हापूरात कार्यालय असलेल्या विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे पाठवला होता. ती कारवाई रद्द होऊ शकते. यासाठी ६५ लाख रुपये द्यावे लागतील, असा फोन मिलिंद नलावडे याने अकलूजमधील प्रदीप चंद्रकांत माने याला केला होता. त्यानंतर अकलूज पोलिसांनी या प्रकरणाची गोपनीय चौकशी करून माहिती घेतली असता खंडणीचा प्रकार उघडकीस आला. या घडामोडीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कायद्याचे रक्षण करायचे काम ज्यांच्यावर सोपवले आहे, त्यांच्याकडूनच खंडणीसारखे गंभीर गुन्हे घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
अटकेच्या भीतीने वैद्यकीय रजा टाकून पसार
याबाबत माने याने दिलेल्या फिर्यादीचा तपास करताना अकलूज पोलिसांनी समीर याच्यासह आणखी चार संशयितांची नावे निष्पन्न केली. यात कोल्हापूर मुख्यालयातील सहायक फौजदार मिलिंद नलावडे याचे नाव समोर आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. अटकेच्या भीतीने नलावडे हा वैद्यकीय रजा टाकून पसार झाल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.