देहव्यापाराच्या टोळीचा पर्दाफाश (File Photo : Kuntankhana)
नागपूर : गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने (एएचटीयू) ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत कळमना ठाण्यांतर्गत देहव्यापाराच्या टोळीचा पर्दाफाश केला. ग्राहकाला महिला पुरवताना महिला दलाला ममता जयंत नागवंशी (वय ३४, रा. गुलमोहरनगर, भरतवाडा रोड) हिला अटक करून पीडित तरुणीची सुटका केली. गुरुवारी दुपारी तिला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ममता ही रॅकेट चालवत होती. ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिला आणि तरुणींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यवसायात ढकलत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या एएचटीयूला मिळाली. ममताला रंगेहात पकडण्यासाठी पंटरला ग्राहक बनवून पाठविले. पंटरने ममताशी सौदा केला. तिने त्याला दुपारी ३.३० वाजता भरतवाडा रोडवरील उमंग बारजवळ बोलावले. ममताने पीडितेला पंटरकडे सोपविताच आधीच तयारीत असलेल्या पोलिसांनी तिला रंगेहात पकडले.
हेदेखील वाचा : Beed Crime: कॉलेज राजकारणामुळे भावाचा आत्महत्येचा प्रयत्न; जीव वाचवताना प्राध्यपिका 80% जळाल्या; मृत्यूशी झुंज
पोलिसांनी तिच्याकडून रोख २३०० आणि मोबाईल असा एकूण १२ हजारांचा माल जप्त करत गुन्हा नोंदविला. जप्त माल व आरोपी महिलेला पुढील कार्यवाहीसाठी कळमना पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक ललिता तोडासे, श्याम अंगथुलवार, दीपक बिंदाने, सचिन श्रीरामे, सुनील वाकडे, शरीफ शेख, पल्लवी वंजारी, अश्विनी खोडपवार, विलास चिंचुलकर आणि नितीन वासने यांनी केली.
हमाली करता-करता बनली दलाल
ममता ही कळमना बाजारात हमाली करते. एकेकाळी तीसुद्धा पीडित होती. या दरम्यान तिची अनेकांशी ओळख झाली आणि तिने दलाली करण्यास सुरुवात केली. ती कळमना बाजारात हमालीचे काम करणाऱ्या महिला आणि तरुणींना देह व्यापारात ढकलत होती. पोलिसांनी तिच्या तावडीतून सोडवलेली २४ वर्षीय तरुणी ही तिच्यासोबतच बाजारात हमाली करत होती. ममतासोबत या रॅकेटमध्ये कोण-कोण आहेत याचा शोध पोलिस घेत आहे.
हेदेखील वाचा : Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद






