मसाज पार्लरच्या नावे सुरू होता देहव्यापार
पुणे / अक्षय फाटक : पोलिसांनी केलेल्या ‘डोळेझाक’ कार्यपद्धतीमुळे शहरात स्पाच्या आडून वेश्याव्यवसाय जोमात सुरू असल्याचे दिसत आहे. नवख्या अधिकाऱ्यांनी पदभार स्विकारल्यानंतर अशा अवैध गोष्टींची माहिती मिळवून त्यावर धडक कारवाई करतात. मात्र, इतके दिवस सुरू असणारा हा गोरख धंदा, का दिसला नाही? की डोळेझाक करून त्याला एकप्रकारे आश्रय दिला जात होता का? असा प्रश्न विचारला जात आहे. नव्याने उदयास आलेल्या वेश्या व्यवसायातील त्रिकोटाने स्पाचे जाळेच निर्माण केले आहे. त्यावर पोलिसांना अद्याप धडक कारवाई करता आलेली नाही.
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत, अवघ्या १५ व १७ वर्षांच्या मुलींना वेश्याव्यवसायात ढकले गेल्याचे दिसून आले. हा प्रकार अधिक चिंताजनक असून, धक्कादायक म्हणजे, आई आणि मुलगीच एकाच ठिकाणी वेश्या व्यावसायत गोवल्या गेल्या होत्या. गरिबीचा गैरफायदा घेऊन त्यांना यात ढकलले गेले.
बाहेर राज्यातून मुलींना कामाला लावू, पैसा मिळेल असे सांगून मोठया शहरात आणले जाते. नंतर त्यांना या दलदलीत ढकलले जाते. पुन्हा मात्र या मुली यातून बाहेर पडू शकत नाहीत. त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकलेला असतो. त्यांचे कागदपत्रे या दलालाकडून ताब्यात ठेवले जातात. दरम्यान गेल्या काही वर्षात मात्र, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ग्रामीण भागातील तरूणींना यामध्ये ढकलले जात आहे. पैश्यांचे आमिष, रहायला आणि लाईफ स्टाईल अश्या गोष्टीत त्यांना अडकवले जात आहे.
मुंबईनंतर वेश्या व्यवसायात पुण्याचा क्रमांक लागत आहे. पुण्यात अनेक मोठे मासे तयार झाले आहेत. त्यावर काही वर्षांपूर्वी जरब बसणारी कारवाई झाली होती. तेव्हा ही साखळी मोडीत निघाली होती. नंतर त्यांनी शहरातून काढता पाय घेतला होता. पुन्हा मात्र त्यांनी शहरात बस्तान बसवले आहे. त्यावर एक विशेष मोहीम सुरू करून कारवाई करणे अपेक्षित आहे.
वेगवेगळ्या नावाने ऍक्टिव्ह..
शहरात दलाल व एजंट वेगवेगळ्या नावाने सक्रिय असतात. पोलीस मॅनेज असतील तर कारवाई झाली तरी टोपण नावाने गुन्हा नोंद करून पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही असे टाकले जाते. नंतर ह्याच व्यक्ती दुसऱ्या नावाने पून्हा सक्रिय होतात.
पब, ड्रग्जप्रमाणे कारवाई अपेक्षित
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ज्या प्रमाणे पब संस्कृती आणि ड्रग्जचे फोफावलेले जाळे मोडीत काढले त्याप्रमाणे कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणारे हे वेश्या व्यावसायाचे जाळे मोडीत काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
खुलाआम केल्या जात आहेत जाहिराती
शहरातल्या स्पा बाबत समाज माध्यमासह विविध जाहिरात प्लॅटफॉर्मवरून ‘बॉडी स्पा’, ‘रिलॅक्सेशन सेंटर’ अशा नावाखाली खुलेआम वेश्याव्यवसायाची जाहिरात केली जाते. पोलिसांच्या यंत्रणांनी त्याकडे डोळेझाक केलेली आहे.
‘ते’ त्रिकूट शोधावे लागेल
वेश्या व्यवसायात उदयास आलेले ते कितीतरी रुपयांचे ‘धन’ घेऊन ‘राज’ व त्याचे ‘प्रिय’ व ‘अनु’ जात’ असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे प्रमुख सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत की डोळेझाक करत हा संशोधनाचा विषय आहे.
विभाग केला; कारवाई घटली
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून यापूर्वी वेश्या व्यवसायावर कारवाई केली जात होती. मात्र, हा विभाग सर्व प्रकारच्या बेकायदा धंद्यांवर कारवाई करीत असे. यातून मलिदा देखील मोठा मिळवत होते. त्यामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या विभागाला बरखास्त करून ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग’कार्यरत केला. या विभागाने प्रामुख्याने वेश्या व्यवसायावर कारवाई करणे अपेक्षित आहे. पण, या बदलानंतरही ठोस व प्रभावी कारवाई झाल्याचे दिसून आलेले नाही. कारवाईचे प्रमाण कमी झाले असून, अनेक स्पा पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत.