पुणे: पुण्याच्या दौंड तालुक्यातील राहू माधवनगर येथून एक संतापजनक आणि धक्कदायक बातमी समोर आली आहे. २७ ऊसतोड वेठबिगार कामगार व त्यांच्या कुटुंबियांना बंधनमुक्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. या वेठबिगार कामगारांची सुटका यवत पोलीस आणि तहसीलदारांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. नुकताच मुंबईच्या १७ मुलांना ओलीस ठेवल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. आता असाच धक्कदायक प्रकार पुण्यात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व २७ कामगार दौंड तालुक्यातील राहू माधवनगर येथील जमीन मालक हिरामण गणपत गाढवे याच्याकडे ऊस तोडणीसाठी आले होते. मात्र गाढवे यांनी या कामगारांना आपल्या गावाकडे परत जाण्यास मज्जाव केला त्यांना बंधक करून ठेवले. याप्रकरणी सौ. मनिषा शिवाजी जाधव, वय 45 वर्षे, मूळ राहणार मनेवाडी, कोपरगाव, जि. अहिल्यानगर सध्या राहणार राहु, ता. दौंड, जि. पुणे यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, मनिषा जाधव मागील वर्षापासून हिरामण गाढवे यांच्या गुन्हाळावर तसेच त्यांच्या शेतीमध्ये ऊसतोडीचे काम करीत होत्या. त्यांचे पती, दोन मुलगे, सून आणि लहान नातवंडे यांच्यासह त्या मजुरी करून उदरनिर्वाह करत होत्या. कामाचा मोबदला प्रति टन 300 रुपये ठरवण्यात आला होता. मात्र, गुऱ्हाळ मालक हिरामण गाढवे वारंवार मागणी करूनही कामाचा योग्य हिशेब देत नव्हते. तसेच त्यांनी मजुरांना गावाबाहेर जाण्यास मनाई केली होती. कोणत्याही कारणाने, अगदी नातेवाईक आजारी पडले किंवा मयत झाले तरी गावाला जाण्यास मजुरांना बंदी घालण्यात येत होती. याविरोधात आवाज उठविल्यास धमक्या दिल्या जात होत्या.
आजारी असूनही काम कर
दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी हिरामण गाढवे आणि अरुण गाढवे यांनी फिर्यादींच्या भाच्याला, शिवराम रघुनाथ रजपुत याला आजारी असूनही काम करत नाहीस या कारणावरून ऊसाने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि घरात बंद करून ठेवले. त्यानंतर मजुरांना पोलिसांकडे तक्रार केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली.
लहान मुलांचा समावेश
या प्रकारची माहिती मिळताच, दि. 28 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता यवत पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 27 वेठबिगार कामगारांची सुटका करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. या मजुरांमध्ये पुरुष महिला आणि लहान मुले यांचा समावेश आहे.
पुढील कारवाई सुरु
या घटनेनंतर यवत पोलिसांनी हिरामण गणपत गाढवे आणि अरुण गणपत गाढवे, दोन्ही राहणार राहु, ता. दौंड, जि. पुणे यांच्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संतापाचा वातावरण आहे.
Rohit Arya Viral Video: ‘तो वैकुंठला गेला तर…’; रोहित आर्यच्या पत्नीचा व्हिडीओ व्हायरल






