दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला तीव्र विरोधानंतर अखेर आली जाग; आता डिपॉझिट न भरताच उपचार
Pune Deenanath Mangeshkar Hospital News in Marathi : पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने रुग्णाच्या उपचारासाठी १० लाख रुपयांची मागणी केली होती. महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यानंतर रुग्णाकडे उपचारांसाठी दहा लाखांची मागणी केली होती. हातात असलेले अडीच लाख भरायला तयार असतानाही प्रशासन महिलेला दाखल करण्यास तयार नव्हते.
शेवटी दूसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. अखेर जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तनिषा सुशांत भिसे असे जीव गेलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. याचदरम्यान आता शिंदे शिवसैनिकांकडून रुग्णालयावर चिल्लर फेकत संताप व्यक्त करण्यात आला.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने तनिषा भिसे पैशांच्या हव्यसापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला जीव गमावावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐन वेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेला. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांनी आपली आई गमावली नसती, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. प्रसूती वेदना तीव्र झाल्याने, महिलेला खाजगी गाडीने २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिने जुळ्या मुलींना जन्म दिला, पण वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत बिघडली. तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र, गर्भवती महिलेचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.
या प्रकरणाबद्दल अधिक माहितीनुसार, भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली उर्फ ईश्वरी उर्फ तनिषा भिसे यांना प्रसूती वेदना होत होत्या.सुशांत यांनी पत्नीला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेले. त्यावेळी त्यांच्याकडे 10 लाखांची मागणी करण्यात आली. त्यावर अडीच लाख रुपये आता तातडीने भरतो. उपचार सुरू करा, अशी विनंती सुशांत भिसे यांनी केली. पण, रुग्णालयाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. यात गर्भवतीची तब्बेत खालावली आणि जीव गेला. याप्रकरणी आता उबाठा आणि शिंदे शिवसैनिकांडून रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. तसेच रुग्णालयाच्या बाहेर चिल्लर फेकत संताप व्यक्त करण्यात आला.