संग्रहित फोटो
पुणे : साहेब, मी माजी उपसरपंच आहे. मला व्यसनाच काही माहित नाही. पण, मित्रांसोबतच एकदाच ड्रग्ज घेतला अन् अंगलट आलयं, ही आहे पोलिसांनी ड्रग्ज रॅकेटप्रकरणात झाडाझडती सुरू केलेल्या एका तरुणाची कहाणी. अपहरणाच्या गुन्ह्यातून उघड झालेल्या ड्रग्ज प्रकरणातील ड्रग्ज पिणाऱ्या त्या ७६ जणांची पोलिसांकडून झाडाझडती सुरू आहे. त्यातील २१ जणांची पुणे पोलिसांनी सोमवारी झाडाझडती घेतली. त्यात सर्वजण तरुण असल्याचे दिसून आले आहे.
अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास सुरू असताना हे ड्रग्जप्रकरण उत्तमनगर पोलिसांनी उघडकीस आणत सुनील गोपाळ राठोड उर्फ राठ्या राठोड (वय २८), राजन गोपाल नायर (वय ३७), जतीन जयवंत कदम (वय २६, रा. वारजे) व शुभम संतोष दहिभाते (वय २८, रा. कोंढवे धावडे) यांना अटक केली होती. त्यांच्याकडून मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त केला होता.
ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील प्रमुख आरोपी सुनील उर्फ राठ्या राठोड याच्या मोबाईलमध्ये जवळपास ३०० ते ३५० ट्रांझेक्शन समोर आले होते. त्यातील ७६ जणांची नावे पोलिसांनी समोर आणत त्यांचा शोध सुरू केला. त्यात अनेकजण हे ड्रग्ज पिणारे असल्याचे समोर आले होते. त्यातील २१ जणांची पोलिसांनी सोमवारी झाडाझडती घेतली.
दरम्यान, यात एका माजी उपसरपंच असलेल्या तरुणाचा देखील समावेश होता. चौकशीत त्याने सांगितलेली कहाणी ऐकूण पोलिस देखील चक्रावून गेले. तो म्हणाला, “साहेब, मी माजी उपसरपंच आहे. मित्रांसोबत पार्टीला गेलो असता काही मित्रांमुळे मी ड्रग्ज घेतला. त्यात माझ्याच मोबाईलमधून पेमेंट केले” मी, असल काही करत नाही. पोलिसांकडून आता यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली असून, हे आणखी कोणाकडून ड्रग्ज घेतात का किंवा घेतले आहेत का याचा तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : हृदयद्रावक! अकरा महिन्याच्या चिमुकल्याला आईनेच फेकलं विहिरीत; बाळाचा मृत्यू
काहींचा ड्रग्जशी संबंध नाही
पोलिसांनी चौकशी केलेल्या २१ पैकी तिघांनी वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे राठ्या राठोड याला पे केले होते. त्यांचा या ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नव्हता. काही जण नोकरी करणारे तर काही जण नशा करणारे असल्याचे समोर आले आहे. या सर्वांना आता पोलिसांकडून समूपदेशन देखील केले जाणार असून, ड्रग्जची वाट सोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मात्र, ज्यांचे या ड्रग्जमध्ये पाय खोलात असतील अशांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.






