संग्रहित फोटो
पुणे : वडगावशेरी भागात सोमनाथ नगरमध्ये प्रतिबंधित व जीवघेणा ठरू शकणाऱ्या इंजेक्शनची विनापरवाना विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अमीर अनिस खान (वय ३०, रा. वडगावशेरी) असे आरोपीचे नाव आहे. इंजेक्शनचा नशेसाठी वापर केला जात होता. याप्रकरणी विश्वनाथ शंकर गेणे (वय ४५, पोलिस हवालदार, चंदननगर पोलिस ठाणे) यांनी चंदननगर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, खान याच्या ताब्यातून १५ बाटल्या औषध जप्त करण्यात आले आहे. या इंजेक्शनच्या एका बाटलीचा दर दीड हजार रुपये आहे. त्याचा वापर नशेसाठी करण्यात येत होता. आरोपीला औषधाची विक्री करण्यासाठी कोणतेही वैद्यकीय शिक्षण अथवा परवाना नसतानाही त्याने फायद्याच्या उद्देशाने त्याची विक्री सुरू ठेवली होती.
हे इंजेक्शन डॉक्टरांचा सल्ला न घेता वापरल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. यातून व्यक्तीच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, तसेच मृत्यू होण्याची शक्यताही असते, अशी माहिती पोलिसांनी दिली. चंदननगर पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास केला जात असून, याप्रकरणात आणखी कोणी सामील आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
हे सुद्धा वाचा : सराईत गुंडाच्या एन्काऊंटरप्रकरणी मोठी अपडेट; पत्नीने पलिसांना धक्काबुक्की केली अन्…