संग्रहित फोटो
पुणे : हडपसर परिसरात दुचाकीचालक तरुणीचा विनयभंग करुन पसार झालेल्या एकाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. अटकेनंतर पोलिसांनी अवघ्या २४ तासाच्या आत लष्कर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. अश्विन भीमराव कांबळे असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत २४ वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक निलेश जगदाळे, सहायक निरीक्षक हसीना शिकलगार व त्यांच्या पथकाने केली आहे.
तरुणी हडपसर भागातील माळवाडी परिसरातील डीपी रोडने निघाली होती. ती दुचाकीवर असताना कांबळे दुचाकीवरुन तरुणीचा पाठलाग करत होता. त्याने तरुणीला अडवले. तिचा विनयभंग केला. माझ्याशी विवाह कर, असे सांगून तिचा मोबाइल संच हिसकावून तो पसार झाला. घटनेची माहिती तिने वडिलांनी दिली. नंतर वडिलांनी आरोपी कांबळेला जाब विचारला. तेव्हा त्याने तरुणीच्या वडिलांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तरुणीने हडपसर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पसार झालेल्या कांबळेला अटक करण्यात आली.
आरोपीकडून तरुणीचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर तरुणीचा जबाब लष्कर न्यायालयात भारतीय न्याय संहितेतीली कलम १८३ अन्वये नोंदविला आहे. घटनास्थळाचा दोन पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला, तसेच पोलिसांकडून आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. तांत्रिक पुरावे संकलित करुन आरोपी कांबळेला लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले.