पुणे/अक्षय फाटक : गंगाधाममधील भीषण अपघातानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आल्याचे दिसत असून, दोन दिवस विशेष मोहिम राबवत पोलिसांनी शहरात वाहतूक नियम मोडणाऱ्या तसेच प्रवेश बंदी असलेल्या रस्त्यांवर धावणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन दिवसांच्या विशेष मोहिमेत तब्बल २४ अवजड वाहनांवर थेट गुन्हे दाखल केले असून, ६४५ केसेस करून १० लाखांचा दंड आकारला आहे. तर, ड्रंक अँड ड्राईव्हत तब्बल ७२ केसेस करण्यात आल्या आहेत. यापुढेही ही मोहिम सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
मार्केट यार्डच्या गंगाधाम चौकात तीन दिवसांपूर्वी एका बेदरकार ट्रक चालकाने सासरा व सुनेच्या दुचाकीला धडक दिली. यात एका ३० वर्षीय विवाहीत तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. नंतर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. शहरात दिवसाच्या वेळेस अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली असताना हे वाहने फिरत असल्याचे सतत दिसून आलेले आहे. सातत्याने पोलीस त्यांना बंदी घालत असतानाही ते फिरत होते. काही ठराविक मार्ग हे ‘रेड झोन’ म्हणून घोषित केलेले आहेत. त्यांना पिकहावर्स तसेच काही ठरावीक वेळांसाठी हा मार्ग प्रवेश निषिद्ध आहे, असे स्पष्ट आदेश आहेत. तरीही हे वाहन चालक नियम पायदळी तुडवत रस्त्यावर उतरतात.
गेल्या अडीच वर्षांत शहरात २०० पेक्षा अधिक अपघातांमध्ये २१४ नागरिकांचा बळी गेला आहे. तर १९० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता पोलिस विभागाने आता कडक धोरण स्वीकारत, नियम मोडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी वाहतूक शाखेला धारेवर धरले होते. तसेच, बंदी असलेल्या रस्त्यांवर ही वाहने आल्यास त्यावर कडक कारवाई करून थेट गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानूसार, तब्बल २४ गुन्हे नोंदवले आहेत.
मार्केटयार्ड, गंगाधाम, सिंहगड रोड, वाघोली, बाणेर, पौड फाटा तसेच वारजे या भागात अवजड वाहनांवर कारवाई करून २४ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यामध्ये ट्रक, जेसीबी डंपर अशा वाहनांचा समावेश आहे. याप्रकरणी गुन्हे भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ (धोकादायक वाहनचालना) व कलम २२३ (सार्वजनिक रस्त्यावरून अपायकारक वस्तू नेण्यास मनाई) अंतर्गत दाखल करण्यात आले आहेत.
वाहतूक पोलिसांची विशेष मोहिम (शुक्रवार व शनिवार)
वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासंदंर्भाने दोन दिवस विशेष मोहिम राबवली आहे. अवजड वाहने बंदी असणाऱ्या रस्त्यांवर तसेच बंदी असलेल्या वेळेत रस्त्यावर दिसल्यास त्यांच्यावर ही कारवाई सुरू आहे. दोन दिवसांत २४ गुन्हे नोंद केले आहेत. यापुढे देखील कारवाई सुरू राहणार आहे. वाहने जप्तीची देखील कारवाई केली जाईल.
– अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग