संग्रहित फोटोे
पुणे : मद्य पिऊन वाहन चालवल्यानंतर होणारे अपघात विशेषतः राज्यभरात गाजलेला कल्याणीनगरमधील हायप्रोफाईल अपघात प्रकरणानंतर पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने मद्यपी वाहन चालकांवर ‘वक्रदृष्टी’ टाकली असून, वर्षभरातच तब्बल ६ हजार ६५८ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली आहे. पोर्शे अपघातानंतर ही कारवाई तीव्रतेने केली आहे. फक्त कारवाईच न करता या चालकांचे परवाने रद्द करण्यासाठी देखील कारवाई केली आहे. त्यामुळे आता अशा वाहन चालकांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे. मद्यपीवर लगाम देखील काही प्रमाणात बसला आहे.
कल्याणीनगर भागात (१९ मे २०२४) पबमध्ये पार्टी केल्यानंतर मद्याच्या नशेत असलेल्या अल्पवयीन धनिक मुलाने भरधाव पोर्शे ह्या आलिशान कारने आयटी इंजिनीअर तरुण-तरुणीला उडवले. ज्यात त्यांचा जागीचं मृत्यू झाला. हे प्रकरण राज्यभरात गाजले. पोलीस, नंतर ससून आणि राजकीय हस्तक्षेप या गोष्टीमुळे सातत्याने पुणेकरांचे लक्ष लागले होते.
अपघातामुळे शहरातील वाढती पब संस्कृती आणि त्याच्या नावाखाली होत असलेला नंगानाच देखील समोर आला. यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक भूमिका घेतली. हॉटेल्स विशेष करून शहरातील पब तसेच अल्पवयीन वाहन चालक आणि मद्यपींवर जोरदार कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानूसार, सातत्याने अचानक विशेष मोहिम राबवून वाहतूक पोलीस अल्पवयीन वाहन चालक व मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करतात.
मे २०२४ ते एक मे २०२५ या कालावधीत वाहतूक पोलिसांनी ६ हजार ६५८ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. फक्त कारवाई न करता त्यांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्तावही प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविले आहेत,’ अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
अल्पवयीन चालकांवर कारवाई
अल्पवयीन वाहन चालकांवरील कारवाईही वाढवली असून, पोलिसांनी ८२ अल्पवयीन दुचाकीस्वारांवर केली आहे. गंभीर अपघात प्रकरणात मुलांना वाहने चालविण्यास देणाऱ्या आठ पालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
अपघातानंतर झालेला बदल
मद्यपी वाहन चालकांवर पुर्वी वर्षभरात शेकड्यात कारवाई होत होती, ती यंदापासून हजारोंच्या घरात गेली आहे. तसेच, ३१ डिसेंबरच्या पुर्वसंध्येला पोलीस विशेष मोहिम राबवत होते. मात्र, अपघातानंतर आता सातत्याने विशेष मोहिम राबविली जात आहे. त्यामुळे मद्यपी तसेच अल्पवयीन वाहन चालकांना जरब बसला आहे.
ससून रुग्णलायातील डॉ. अजय तावरे याने निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज केला आहे. या अर्जावर मंगळवारी (२० मे) सुनावणी होणार आहे. अशा प्रकारचे अर्ज खटल्याची सुनावणी लांबविण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत, असे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी स्पष्ट केले. तर, आरोपी आदित्य सूदने जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर १९ मे रोजी सुनावणी होणार आहे.
अपघाताला वर्ष पूर्ण
पोर्शे कार अपघात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल अपघाताला एक वर्ष पूर्ण (१९ मे) झाले. याप्रकरणातील दहा आरोपींवर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. खटला जलदगतीने चालविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्यापही याप्रकरणात ८ आरोपींना जामीन मिळालेला नाही. ते सध्या येरवडा कारागृहात आहेत.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दहा आरोपी आहेत. हा खटला जलदगतीने चालविण्याची विनंती करण्यात आली आहे. पोलिसांनी सखोल तपास केला असून, या प्रकरणातील आठ आरोंपीना अद्याप जामीन मंजूर झालेला नाही.
– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे
कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा गुन्हे शाखेकडून सखोल तपास करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध सबळ पुरावे संकलित करण्यात आले आहेत.
– शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा
या प्रकरणातील आरोपी शिवानी अगरवालला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. उर्वरित आरोपींचे जामीन न्यायालयाने फेटाळले आहेत. उच्च न्यायालायात आरोपींनी जामीन अर्ज सादर केले आहेत. जून महिन्यात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. हा खटला जलदगतीने चालवून निकाली काढण्यासाठी सरकार पक्षाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
– शिशिर हिरे, विशेष सरकारी वकील, कल्याणीनगर अपघात प्रकरण
अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला बारा तासांच्या आता जामीन मंजूर केल्याने चर्चेत आलेल्या बाल न्याय मंडळात (जेजेबी) आता गुन्ह्याचे स्वरूप विचारात घेऊन जामीन दिला जात असल्याची माहिती वकिलांनी दिली. या मुलांना बालसुधारगृहात ठेवले जाते. तेथे त्याचे समुपदेशन केल्यानंतर जामीन मंजूर केला जातो.
– ॲड. यशपाल पुरोहित
वर्षभरात ७७ हॉटेल, पबवर कारवाई
अपघातानंतर पोलिसांनी शहरातील उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या ७७ हॉटेल, पबविरुद्ध वर्षभरात कारवाई केली. आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २१ पब आणि बारचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी १६ पब, रेस्टॉरंट, बारवर, तर नियम धुडकाविणाऱ्या २१ पब आणि बारविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. नियमांचा भंग केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्षभरात ४०५ बार, रेस्टाॅरंटविरुद्ध कारवाई केली आहे. उत्पादनशुल्क विभागाकडून २९ रुफटाॅप हाॅटेलविरुद्ध कारवाई करण्यात आली, तसेच नियमभंग केल्याप्रकरणी ७७ बारचे परवाने निलंबित करण्यात आले.