सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुणे शहर पोलिस दलात नव्याने दाखल झालेल्या ‘मोबाईल सर्वेलन्स व्हॅन’ आणि ‘ड्रोन फ्लॅग ऑफ’च्या मदतीने लपून-छपून तसेच जमिनीच्या आतमध्ये हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन कारवाई करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिसांनी प्रथमच कारवाई केली असून, परिमंडळ चारमधील वेगवेगळ्या भागात ही कारवाई करत १६ गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी तब्बल ३६ हजार ७३५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईत ८५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभागी
याप्रकरणी विश्रांतवाडी, चंदननगर, वाघोली व येरवडा पोलिस ठाण्यात प्रत्येकी २, खडकी व खराडी पोलिस ठाण्यात प्रत्येकी १, विमानतळ व लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी ३ असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. कारवाईत ८५ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू
पुणे शहरातील विविध भागात छुप्या पद्धतीने अवैध धंदे चालविले जात आहेत. विशेषत: परिमंडळ पाच व चारमधील ग्रामीण भाग असलेल्या भागात गावठी दारू बनवून त्याची शहरभर विक्री होत असल्याचे यापुर्वीही अनेकवेळा सातत्याने समोर आलेले आहे. विक्री करताना पोलिसांनी कारवाई केल्यानंतर देखील उत्पादन मात्र थांबत नसल्याचे दिसत आहे.
तब्बल १६ ठिकाणी छापेमारी
या पार्श्वभूमीवर उपायुक्त मुंडे यांनी विशेष मोहिम हाती घेत थेट हातभट्टीवरच कारवाईचे आदेश दिले. शहर पोलिस दलात नुकतेच मोबाईल सर्वेलन्स व्हॅन व ड्रोन फ्लॅग ऑफ ही अत्याधुनिक व्हॅन दाखल झाली आहे. या ड्रोनच्या मदतीने परिमंडळ चारमधील सर्वच ठिकाणी एकाचवेळी शोध मोहिम राबविण्यात आली. त्यानूसार, वेगवेगळ्या भागात शोध मोहिम राबवत पोलिसांनी तब्बल १६ ठिकाणी छापेमारी करून कारवाई केली आहे. पोलिसांनी ३६ हजार ७३५ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात ३१ हजार ६३० रूपयांची ३१८ लीटर गावठी हातभट्टी तयार दारू व २ हजार ९६० रूपयांची ६ लिटर दारू जप्त केली आहे.