पुणे पोलिसांचे नागरिकांना मद्य पिऊन वाहन न चालवण्याचे आवाहन (फोटो- istockphoto)
पुणे: यंदाचे वर्ष संपण्यासाठी अवघा एकच दिवस शिल्लक राहिला आहे. येणाऱ्या 2025 या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. नवीन वर्षाच्या स्वागताची सगळीकडे जोरदार तयारी सुरु आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. याच निमित्ताने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणेकरांना एक आवाहन केले आहे. मद्य प्राशन करीन वाहन चालवू नये असे आवाहन पुणे पोलीस आयुक्त यांनी सर्व नागरिकांना केले आहे.
थर्टी फर्स्टला जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असाल तर आधी सावध व्हा. कारण पुणे पोलिसांकडून शहरात जागोजागी चौकात अशा तळीरामांवर ‘ड्रंक ॲंड ड्राईव्ह’ मोहिमेद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. ‘ब्रेथ ॲनालायझर’द्वारे जागोजागी वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार असून त्यामध्ये जर मद्यपान करून चारचाकी किंवा दुचाकी चालवल्याचे आढळल्यास त्यांची रवानगी मोटार वाहन कायद्यानुसार थेट तुरूंगात केली जाणार आहे. म्हणून, पुणेकरांनी मद्य प्राशन न करता वाहन चालवू नये, तसेच शक्यतो घरातच राहून नव्या वर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. हॉटेल्स, पब यांनी वेगवेगळ्या समारंभाचे (इव्हेंट) चे आयोजन केले आहे. परंतु, या काळात मद्यपान करून गाडी चालवण्यात येते. त्यामुळे, अपघात होण्याची दाट शक्यता असते. असे प्रकार होऊ नये यासाठी पुणे पोलिसांनी शहरात ३१ डिसेंबरच्या सायंकाळपासून ३ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला आहे. त्यांच्या दिमतीला ७०० वाहतूक पोलिस आहेत. संपूर्ण रात्रभर हा बंदोबस्त राहणार असून गेल्यावर्षी जेथे जेथे वाहतूक कोंडी झाली होती तेथेही सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवून ती कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.
शहरात फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता व कँपमधील महात्मा गांधी रस्ता येथे मोठया प्रमाणात गर्दी होते. तसेच वाहतूक कोंडी होते. गेल्यावर्षी या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. त्यावरून यावर्षी येथे अतिरिक्त पोलिसांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच अशा ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच आणखी १७ गर्दीचे ठिकाणे ओळखण्यात आली असून तेथेही विशेष लक्ष राहणार आहे.
हेही वाचा: हेही वाचा: Pune News: हा काय प्रकार! पुण्यातील पबकडून कंडोम आणि ओआरएस पाकिटांचे वाटप