पुण्यातील वाढत्या गॅंगवॉर आणि रायझिंग गॅंगवर कंट्रोल मिळवण्यासाठी पुणे पोलिसांच्या विशेष प्रयत्न करणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
Pune Police News : अक्षय फाटक : पुणे : ‘वरातीमागून घोडे’ ही म्हण तंतोतंत सध्यस्थितीत पुणे पोलिसांना लागू होत आहे. अलीकडच्या काळात गँगवार, हल्ले, खंडणी, ड्रग्सची तस्करी, आणि सोशल मीडियावरून गुन्हेगारीला मिळणारा प्रोत्साहनपर ठसा यामुळे गुन्हेगारीचं स्वरूप अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. यानंतर आता पोलिसांनी गुन्हेगारांचा वाढलेला उन्माद अन् गुन्हेगारीचा आलेख उतरवण्यासाठी शहरातील ८८ रायझिंग टोळ्यांवर क्लोज वॉच ठेवण्यास सुरूवात केली असून, वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत.
शहरात प्रमुख टोळ्यांसोबत नव्याने तब्बल ८८ टोळ्या सक्रिय आहेत. ज्या पोलिसांच्या मते रायझिंग टोळ्या म्हणून ओळखल्या जात आहेत. प्रमुख टोळ्यांपेक्षा या टोळ्यांचा गेल्या काही वर्षात चांगलाच उन्माद वाढला आहे. सर्व सामान्यांवर दहशत माजवणे गोंधळ घालणे, वाहन तोडफोड करणे तसेच रात्री अपरात्री गोंधळ घालण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे पुण्याची शांतता ही भंग पावत चालल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे पुणे पोलिसांनी उटसूट लाव मोक्कामुळे टोळ्यांची संख्या तर आकडेवारीत भयावह झाली आहे. मोक्कात जेलमध्ये अन् त्यातूनच जामीनावर बाहेर आल्याने गल्ली-बोळातल्या गुन्हेगारांना देखील भाईच फिलींग येऊ लागले. त्यांनी भाईगिरीचा माज दाखवण्यास सुरूवात केली. त्यांच्यामुळे रस्त्यावरील रक्तरंजित खेळ व दहशतीचा माहोल आधीकच वाढल्याचे चित्र आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीत नवख्या अन् रायझिंग टोळ्या व जुन्या गुन्हेगारांनी नव्या पद्धतीने नेतेगिरीच्या पद्धतीने प्रवेशकरून तोच जोश, तीच ताकद म्हणत परिसरात ‘माहोल’ निर्माण केला. पण, पोलिसांना हे होण्यापुर्वी किंवा होताना काहीही करता आले नाही, आता असेच म्हणावे लागेल. दुसरीकडे दोन टोळ्यांमध्ये सध्या टोकाची युद्ध सुरू आहे. कुटुंबियांच्या रेकी व टार्गेट स्पष्टकरुन निशाणा साधला जात आहे. हे सुरु असताना कुख्यात गँगस्टरांच्या टोळीतील सराईत गुन्हेगारांनी सर्व सामान्यांवर गोळीबार आणि कोयत्याने वार केले. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीचे भयावहन वास्तव दिसून आले. पोलीस गुन्हेगारीला लगाम लावू, त्यांना अद्दल घडेल अशी कारवाई करु किंवा गुन्हेगारीला थारा नाही असे म्हणत असले तरी शहराची सध्याची परिस्थिती मात्र वेगळीच आहे. त्यामुळेच शहराच्या शांततेसाठी तसेच एकूणच सुरक्षेसाठी पुणे पोलिसांना निर्णायक पावले उचलण्याची गरज सर्व सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
नव्या रायझिंग टोळ्यांसह जुन्या तसेच स्थिरावलेल्या टोळ्यांचा समावेश आहे. त्यांच्या एकूण सदस्यांची यादीतयार करुन त्यांचा पत्ता, गुन्हेगारी इतिहास, सोशल मीडियावरील हालचाली, हत्यारांची उपलब्धता, आर्थिक स्रोत यांचा डेटा संकलित केला जात आहे. गुन्हे शाखेच्या पथकासह सर्व पोलीस ठाण्यांना या टोळ्यांवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ‘क्राईम मॅपिंग’ व ‘रिस्क अॅनॅलिसिस’ पद्धतीचा वापर करुन प्रत्येक टोळीच्या गुन्हेगारी पॅटर्न व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. यासोबत, टोळ्यांमधील प्रतिस्पर्धी गटांची माहिती, हल्ल्याची शक्यता व त्यावर उपाययोजना आखण्यात येत आहे. गुन्ह्यांची माहिती अद्ययावत करत, जे आरोपी जामिनावर आहेत त्यांच्यावर विशेष देखरेख ठेवली जाणार आहे.
परिमंडळनुसार गँग व त्यांची सदस्य संख्या
परिमंडळ | रायझिंग गँग – सदस्य संख्या | प्रमुख गँग – सदस्य संख्या |
---|---|---|
परिमंडळ 1 | 08 – (सदस्य – 101) | 03 – सदस्य (142) |
परिमंडळ 2 | 10 – (सदस्य – 117) | — |
परिमंडळ 3 | 36 – (सदस्य – 489) | 05 – (सदस्य 228) |
परिमंडळ 4 | 15 – (सदस्य – 141) | — |
परिमंडळ 5 | 20 – (सदस्य – 110) | 03 – सदस्य (72) |