राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह पंचायत समितीसाठी आज मतदान (संग्रहित फोटो)
मुंबई : लोकसभा, विधानसभा, नगरपरिषदा या निवडणुकांनंतर नुकत्याच महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहे. त्यासाठी आज मतदान पार पडणार आहे. त्यानुसार, प्रशासनाकडून तयारी केली गेली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान पार पडणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ७३१ तर आणि पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ७ हजार ४३८ इतके उमेदवार निवडणूक रिंगणात असून, सर्व मिळून एकूण २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ इतकी मतदार संख्या आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी पुरेशा पोलिस बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे मतदान पुढे ढकलण्यात आले.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : अंबरनाथमध्ये राजकारणाचा डाव; कॉंग्रेस उमेदवारांवर भाजपचा प्रभाव
आता शनिवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. एकूण ७३१ जागा असून, त्यातील ३६९ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी ८३, अनुसूचित जमातींसाठी २५ आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी १९१ जागा आरक्षित आहेत. जिल्हा परिषदांच्या या सर्व जागांसाठी एकूण २ हजार ६२४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
निवडणूक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती
छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ९ व पंचायत समितीच्या १८ जागांसाठी शनिवारी मतदान होणार आहे. सिल्लोड तालुक्यातील २ लाख ४८ हजार ८७४ मतदार मतदान करतील. यासाठी तालुक्यातील ३०५ मतदान केंद्रे ठेवण्यात आली असून, मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी १४०६ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या ९ जागांसाठी ३९ जण रिंगणात
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील ९ गटांसाठी ३९ उमेदवार रिंगणात राहिले असून, पण पंचायत समितीच्या १८ जणांसाठी ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या शिवना गटात शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये सरळ सामना होत असून, अंधारी जिल्हा परिषद गटात शिवसेना (शिंदे गट) भाजप व शिवसेना (उबाठा) यांच्यात तिरंगी लढत होत आहे.






