File Photo : Arrest
छत्रपती संभाजीनगर : बीडकडून छत्रपती संभाजीनगरमार्गे पुणे येथे जात असलेल्या एका शॉर्पशूटरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी पाचोड टोलनाक्यावरून ताब्यात घेतले. हा कुख्यात गुंड पुण्यातील निलेश घायवळ या गँगचा शॉर्पशूटर असून, त्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
संतोष आनंद धुमाळ (वय 40, रा. खेचरे, तालुका मुळशी, पुणे) असे घायवळ गँगच्या शार्पशूटरचे नाव आहे. त्याच्यावर पुणे येथील विविध पोलिस ठाण्यात एक, दोन नव्हे तब्बल १८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, सर्वच अवैध धंदे आणि अवैध शस्त्रधारक यांच्यावर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आलेले आहे.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ यांना शनिवारी दुपारी बीडवरून छत्रपती संभाजीनगरसाठी निघालेल्या एका काळ्या रंगाच्या स्कार्पिओतून एकजण गावठी कट्टा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक वाघ यांनी पाचोड रोडवरील निवडणूक स्थायी पथकाला यांची माहिती देत संशयित गाडी पकडण्याचे सांगितले. मात्र, तोपर्यंत ती गाडी पाचोड टोल नाक्यापर्यंत पोहचली होती. त्यामुळे पाचोड पोलिसांना संबधित गाडीची झडती घेण्याचे आदेश वाघ यांनी दिले होते. त्यावरून पाचोड पोलिसांनी तात्काळ पाचोड टोलनाक्यावर धाव घेतली.
त्यावेळी परिवारासोबत असलेला संशयित गाडीचा चालक शार्पशूटर संतोष धुमाळ हा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालत होता. त्यावेळी तेथे पोहचलेल्या पोलिसांना पाहाताच गुंड धुमाळ याने धूम ठोकली. मात्र, पाठलाग करत पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या गाडीची पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे शस्त्र आढळून आले नाही. मात्र, तो पुणे येथील निलेश घायवळ याच्या गँगचा शार्पशूटर असल्याचे पोलिसांना कळाले.
मोक्कामध्ये 4 वर्षे होता जेलमध्येच
पुण्यातील निलेश घायवळ गँगसाठी काम करणारा कुख्यात संतोष धुमाळ याच्यावर पुण्यात हत्या, अपहरण, खंडणी असे गंभीर 18 गुन्हे दाखल आहेत. तसेच तो मोक्कामध्ये 4 वर्षे तुरुंगात राहिलेला आहे.