संग्रहित फोटो
निलेश घायवळ मुळचा जामखेड तालुक्यातील सोनेगावचा. निलेशचे वडिल कमिन्स कंपनीत नोकरीस होते. त्यानिमित्ताने हे कुटूंब पुण्याच्या कोथरूडमध्ये वास्तव्यास आले. निलेशचा जन्म पुण्यातला. त्याचे शिक्षण भारती विद्यापीठ, मोरे विद्यालय व यशवंतराव मोहिते महाविद्यालयात झाले. त्याने बॉ. कॉमची पदवी घेतली. शिक्षणानंतर तो ए.आर.आय कंपनीत नोकरीही करू लागला. निलेशला सचिन हा एक भाऊ, जो शिक्षक आहे. त्याच्यावरही नुकतेच गुन्हे नोंद झाले. काही वर्ष त्याने केबल व्यवसाय देखील केला. निलेशला दोन मुले आहेत, जी उच्चशिक्षण घेत आहेत. २०२१ मधील मोक्काच्या गुन्ह्यातून सुटलेल्या निलेशने धाराशिव, जामखेड, बीड या शहरात आमदार महोदयांच्या पवनचक्यांना सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम सुरू केले असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. जामखेडमधील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना राजकीय मदत करतो, असेही निरीक्षण आहे. त्यानेही राजकारणात प्रवेश केला होता. जामखेडमध्ये तो जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरणार होता. पुण्यातील देखील अनेक आमदार व मंत्र्यांच्या तो संपर्कात आहे.
निलेश घायवळला गुन्हेगारीत ‘बॉस’ नावाने ओळखले जाते. एकाच भागातील असल्याने गजानन मारणे, रूपेश मारणे व संतोष शेलार यांच्याशी त्याची मैत्री होती. पण, त्यांच्यासोबतच तो १९९९ पासून गुन्हेगारीत शिरला. दोन खूनाच्या गुन्ह्यात निलेशचा प्रत्यक्ष सहभाग होता. एकाच टोळीचा भाग असलेले गजा मारणे व निलेश यांच्यात वर्चस्व, मनात असलेला मी पणा, आर्थिक उलाढाल, पैसा आणि इतर कारणांनी या दोघांत वाद झाले आणि एकाच भागात दोन टोळ्या निर्माण झाल्या.
मिलींद ढोले व बबलु कावेडीयाचा खून
मिलींद ढोले व निलेश एकाच कंपनीत नोकरीस होते. युनियनवरून वाद होते. यावरूनच गजा मारणे व निलेश याने मिलींद यांचा खून केला. तर बबलु कावेडीया याचा खून सतिश मिसाळ यांच्या खूनाचा बदला म्हणून खून केला.
केबल व्यावसाय व गजा मारणे व निलेशची ताटातूट
येरवडा कारागृहातून गजानन मारणे व बाबा बोडके टोळी चालवत. दोघांचे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहारही सुरू होते. मुळशी येथील जमीन व्यवहारातून त्यांच्यात पहिली ठिंणगी पडली. मारणे टोळीच्या सुधीर रसाळचा बाबा बोडके टोळीने खून केला. नंतर येरवडा कारागृहात बाबा बोडके व गजा मारणे यांच्यात मारामारी झाली. बाबा बोडके निलेश घायवळचाही मित्र असल्याने तो या वादात पडला नाही. पण, तिथूनच गजा मारणे व निलेश यांच्यात ताटातूट होण्यास सुरूवात झाली. कावडीया खूनानंतर निलेश दोन वर्ष फरार होता. फरार काळात त्याने कोथरूडमध्ये केबलचा व्यवसाय चालविला. तर गजा मारणेच्या बापू नायर व उमेश टेमघरे यांचाही केबल व्यवसाय होता. केबल व्यवसाय, बाळा कसबेचा मर्डर, मंडळाचे पोस्टर्स, येरवडा जेलमधील भांडण यातून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यातून मग, या दोघांत वाद वाढत गेले. एकाच भागात असल्याने वर्चस्वावरूनही त्यांच्यातील वाद विकोपाला गेले आणि दोन टोळ्या स्वंतत्र झाल्या.
२००८ पासून स्वतंत्र टोळी…
निलेश घायवळ कारागृहातून बाहेर आल्यानंतर २००८ पासून त्याने स्वतंत्र टोळी निर्माण केली. आपल्याच सहकार्याने स्वतंत्र टोळी निर्माण केल्याने तसेच परिसरात वर्चस्व वाढू लागले होते. गजा मारणे टोळीचे सदस्य त्याच्या मागावर असत. पण, तो हुशार असल्याने यातून तो बचावला गेला. शहरातील एका मोठ्या हस्तीने त्यांच्यात वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. पण, तो निष्फळ ठरला.
दोन वेळा निलेश वाचला
गजा मारणे टोळीकडून दोन वेळा निलेश याच्यावर हल्ला झाला. पण, दोन्ही वेळा तो बचावला गेला. निलेशचा मित्र व आर्थिक सह्हायक समीर पाटील याच्यावरच निलेश म्हणून २००९ मध्ये हल्ला केला होता. नंतर काही महिन्यातच दुसऱ्यांदा शास्त्रीनगर येथे दुसऱ्यांदा हल्ला केला. पण, दोन्ही हल्यातून निलेश बचावला गेला.
रुपेश मारणेवर गोळीबार
दोन वेळा हल्ला झाल्यानंतर निलेशने याचा बदला म्हणून कोथरूडमधील हमराज चौकात रूपेश मारणे याच्यावर गोळीबार केला. याप्रकरणात रूपेश मारणेसोबत असलेल्या सुमित नाईक हा जखमी झाला होता. त्यासोबतच गजा मारणे टोळीतील पप्पू कुडले देखील निलेशच्या मागावर होता. त्यामुळेच त्याच्यावरही निलेश व त्याच्या सदस्यांनी दत्तवाडी पोलिस चौकीसमोर अडवून हल्ला केला. यात पप्पूचा भाऊ सचिन याचा खून झाला होता.
पप्पू कुडलेकडून पाच खून
मारणे टोळीचा पप्पू कुडले याने भाऊ सचिन याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी निलेश घायवळ टोळीतील एकूण तीन जणांचा नंतरच्या काळात खून केला. पप्पू तावरे याचा पहिला खून, नंतर शिवा साष्टे याचा दुसरा, तिसरा खून पप्पू गावडे, नंतर अमोल बधे याचा खून केला आणि अलिकडेच म्हणजे, २०१५ मध्ये पंकज फाटक याचा खून केला.
निलेश घायवळने २०१७ मध्ये सुटल्यानंतर कॉन्टेमेंट टोलनाक्याचे टेंडर विवेक यादव याच्याकडे असल्याने त्याच्याकडे खंडणी मागितली होती. त्यासोबतच कोरेगांव पार्कमधील एका हॉटेल व्यावसायिकाकडे देखील खंडणीची मागणी केल्याने दोन स्वतंत्र गुन्हे नोंद झाले होते. त्याचवेळी भिगवणमध्ये अपहरणाचा एक गुन्हा नोंद झाला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी यात निलेश घायवळ याला एक वर्षासाठी स्थानबद्ध केले होते.
नुकतेच कोथरूड भागात घायवळ टोळीच्या सदस्यांनी एका तरुणावर गोळीबार केला होता. तर दुसऱ्यावर कोयत्याने वार केले होते. याप्रकरणात निलेश याच्यावर गुन्हा नोंद झाला. नंतरच्या तपासात दहशत कमी होत असल्याने व एका पुर्वीच्या टोळीतील सदस्याचा गेम वाजविण्यासाठी निलेश घायवळने टोळीतील काहींना पिस्तूल देऊन त्यांना हे काम दिल्याचे समोर आले. निलेश सध्या लंडनमध्ये फरार आहे. पुढे निलेश याने घायवळ ऐवजी गायवळ नावाने बनावट पासपोर्ट काढल्यावरून त्याच्यावर गुन्हा नोंद झाला. तर वेगवेगळ्या प्रकरणात ८ ते ९ गुन्हे साधारण तीन महिन्यात नोंदवले गेले आहेत. आता निलेश याच्यासोबतच त्याचा भाऊ सचिन गायवळ याच्यावरही पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केली आहे. त्यांचा आर्थिक हिशोब देखील घेतला जात असून, त्यासंदंर्भात आयकर विभागाला कारवाईसाठी पत्र दिले आहे.
निलेश घायवळ याने जामखेड परिसरात ५८ एक्कर शेती खरेदी केली आहे. ती तीन वर्षात. त्याने काही वर्षात बक्कळ पैसा कमावला असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. निलेश उच्चशिक्षीत असल्याने अत्यंत हुशार आहे. त्याने अनेक राजकीय व्यक्तींशी संपर्क ठेवला. त्यांच्या डोक्यावर हात ठेवून हे कामे केल्याचे पोलिसांचे मत आहे. त्यातूनच मोठा होत गेला.
संतोष धुमाळसोबत वाद
पप्पू कुडले, गजानन मारणे व निलेश घायवळ यांच्यातील वाद सध्या तरी मिटलेले असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. पण, घायवळ टोळीचा पुर्वीचा सदस्य संतोष धुमाळ याचे व निलेशचे मुळशीतील एका जमीन व्यवहारातून वाद निर्माण झाले आहेत. त्यातून त्यांच्यात वादविवाद असून, संतोष धुमाळ व पप्पु कुडले यांची एक गुप्त बैठक देखील झाल्याची माहिती आहे. त्यामुळे घायवळ, कुडले व धुमाळ संघर्ष कधीही उफाळून येऊ शकतो, असे पोलिसांचे मत आहे.
निलेश घायवळचे वलय कोथरूड, पुणे शहर, जामखेड, धाराशिव, जामखेड, सोनेगाव, अहमदनगर अशा भागात पसरलेले आहे. त्याच्या टोळीत ६१ सदस्य आहेत. त्यातील १० जण कारागृहात आहेत. तर ९ मयत झाले असून, ४१ जण बाहेर आहेत. मारणे, कुडले व धुमाळ हे घायवळ टोळीचे विरोधक आहेत.






