Ed Raid On Yashwant Bank Shekhar Chargaonkar 112 Crore Money Laundering Casr Karad Phaltan Crime News
मोठी बातमी! यशवंत बँकेवर ED ची रेड; एकाच वेळी 5 ठिकाणी छापे, 112 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार…
Crime News: ही कारवाई पहाटे सुमारे पाच वाजल्यापासून सुरू असून, रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. मात्र, कारवाईबाबत अधिकृत माहिती देण्यास ईडीकडून नकार देण्यात आला.
सातारा जिल्ह्यात ईडीची छापेमारी
एकाच वेळेस 5 ठिकाणी छापे
महत्वाची कागदपत्रे घेतली ताब्यात
कराड:
फलटण (जि. सातारा) येथील यशवंत बँकेतील कथित ११२ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मोठी कारवाई करत फलटण व कराड शहरात पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून, दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते.
ईडीने यशवंत बँकेची कराड येथील शाखा, तसेच बँकेचे माजी अध्यक्ष व राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या कराड येथील निवासस्थानासह विंग परिसरातील फार्महाऊसवर छापा टाकला. याशिवाय गजानन हौसिंग सोसायटी, सोमवार पेठ व वाखाण परिसरातही तपास करण्यात आला. ही कारवाई पहाटे सुमारे पाच वाजल्यापासून सुरू असून, रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. मात्र, कारवाईबाबत अधिकृत माहिती देण्यास ईडीकडून नकार देण्यात आला.
याबाबतची माहिती अशी की, यशवंत बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी १२ ऑक्टोबर रोजी कराड शहर पोलीस ठाण्यात बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी ही फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि ईडी संयुक्तपणे करत असून, यापैकी २२ आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत.
फिर्यादीनुसार, २०१४ ते २०२५ या कालावधीत बँकेच्या व्यवहारांचे वैधानिक लेखापरीक्षण करताना मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामध्ये बोगस कर्ज प्रकरणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटप, तारण न घेता कर्ज मंजुरी, निधीचा गैरवापर, तसेच जुनी थकबाकी खाती बंद दाखवून नवीन खाती उघडून निधी अन्य व्यक्तींकडे वळवण्यात आल्याचे आरोप नमूद आहेत. याच अनुषंगाने ईडीकडून कागदपत्रांची तपासणी आणि चौकशी सुरू असल्याची चर्चा आहे.
या कारवाईत दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत असून, एकाला फलटण येथे नेऊन तपास करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, भाजप नेते व राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर सध्या बाहेरगावी असून, कारवाईची माहिती मिळताच आपण कराडकडे येत असल्याचे त्यांनी कळविल्याची चर्चा आहे. ईडीकडून त्यांचे बंधू शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर यांच्यासह दोन जणांकडून माहिती घेण्यात आल्याचे समजते. मात्र, याबाबत ईडीकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ईडीची ही कारवाई सुरू असल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, तपासातून पुढे कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Title: Ed raid on yashwant bank shekhar chargaonkar 112 crore money laundering casr karad phaltan crime news