Satara Doctor Death Case: डॉक्टर आत्महत्या प्रकरणात ग्रामस्थ आक्रमक; वडवणी गावात बंदची हाक
Satara Doctor Death Case: फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणात आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पीडित महिला डॉक्टरचे मूळ गाव वडवणी आज कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी हा बंद पुकारला आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मुलीने टोकाचे पाऊल उचलले नसून तिची हत्या करण्यात आली आहे. तसेच आरोपींनी पुरावे नष्ट करून नंतर सरेंडर केले, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणाची SITमार्फत (विशेष तपास पथकाद्वारे) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. प्रकरणामुळे फलटण आणि परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. हातावर सुसाइड नोट लिहून आत्महत्या केलेल्या या महिला डॉक्टरच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Satara Doctor Death Case: डॉक्टरांकडून हॅशटॅगवर ‘ट्विटर वादळ’; आत्महत्या प्रकरणात केली मोठी मागणी
या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज बीडच्या वडवणी गावात भव्य मोर्चा आणि रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मोर्चामधून माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी, तसेच SIT मध्ये महिला आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी आयसी कमिटीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन या घटनेची सखोल चौकशी केली.
या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे आणि डॉ. अंशुमन धुमाळ उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चाकणकर म्हणाल्या, “ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. संबंधित डॉक्टर युवतीला न्याय मिळावा यासाठी मी स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांशी दररोज संपर्कात राहून चौकशीची माहिती घेत आहे.”
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, मृत डॉक्टर महिलेने ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादाबाबत तक्रार केली होती. मात्र, आयसी कमिटीने या वादाचे समाधान करून प्रकरण मिटवले होते. आत्महत्येच्या दिवशी ती प्रशांत बनकरच्या संपर्कात होती आणि त्याला अनेक वेळा फोन केला होता, परंतु त्यादिवशी त्याचा मोबाईल बंद होता. त्या संदर्भातील सर्व कॉल रेकॉर्ड आणि सीडीआर रिपोर्ट्स पोलिसांकडून मागविण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
Satara Doctor Death Case: डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; दुसऱ्या आत्महत्येशी काय आहे संबंध?
चाकणकर यांनी सांगितले की, “फॉरेन्सिक आणि पोस्टमार्टम अहवाल आज किंवा उद्या प्राप्त होतील. त्यानंतर या प्रकरणातील सत्य-असत्य स्पष्ट होईल.” त्यांनी पुढे सांगितले की, “राज्यात शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये सुमारे 31 टक्के महिला कार्यरत आहेत. त्यांना कोणताही त्रास किंवा लैंगिक शोषण होऊ नये, यासाठी आयसी कमिट्या प्रत्येक ठिकाणी कार्यरत आहेत. फलटणमध्ये घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणात कोणालाही अभय दिले जाणार नाही,” असेही चाकणकर यांनी स्पष्ट केले.






