सौजन्य - सोशल मिडीया
सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने नऊ वर्षांच्या तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. संशयित भरत विश्वनाथ कांबळे (वय ४८, रा. सुभाषनगर, ता. मिरज) असे शिक्षकाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलींच्या आईने कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचे गावात संतप्त पडसाद उमटले आहेत. पालक आणि संतप्त जमावाने शिक्षक कांबळेला चोप देत कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात दिले.
कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावातील वस्तीवर जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. इयत्ता चौथीच्या वर्गात शिक्षक भरत कांबळे शिकविण्यास होता. शाळेत शिकवत असताना मुलींबरोबर अश्लिल वर्तन करत होता. दिनांक ४ ते ६ सप्टेंबरदरम्यान हा प्रकार घडला. पीडित मुलींनी हा प्रकार घरी सांगितला. सुरुवातीला पालकांनी दुर्लक्ष केले. परंतु, वारंवार हा प्रकार होत असल्याची माहिती पालकांना मिळाली. त्यामुळे पालक त्याच्यावर लक्ष ठेवून होते. सोमवारी चौथीच्या वर्गात शिकवत असताना शिक्षक कांबळे याने मुलींबरोबर अश्लिल प्रकार सुरू केला. पालकांना हा प्रकार निदर्शनास येताच त्याला पालकासह नागरिकांनी चाेप दिला.
तातडीने निलंबनाची कारवाई
गटशिक्षणाधिकारी प्रमोद गोपणे यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने नऊ वर्षांच्या तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिली. त्याची दखल घेत धाेडमिसे यांनी तातडीने शिक्षक कांबळे याच्यावर निलंबनाची कारवाई केली.