लहान मुलांच्या भांडणात मोठ्यांची उडी; बेदम मारहाण करून केले गंभीर जखमी
भिवंडी : लहान मुलांच्या क्षुल्लक भांडणातून बापलेकाने आपसात संगनमताने शेजाऱ्यासह त्याच्या पत्नीला शिवीगाळ केली. शेजाऱ्याला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शांतीनगर परिसरातील न्यू आझादनगर येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात बापलेकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुस्ताक अन्सारी, साहील अन्सारी अशी गुन्हा दाखल झालेल्या बापलेकांची नावे आहेत. तर इस्लामुद्दीन कयामुद्दीन अन्सारी (वय ३६) असे मारहाणीत जखमी झालेल्या शेजाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापलेक आणि जखमी हे एकमेकांचे शेजारी असून, ते शांतीनगर हद्दीतील न्यू आझादनगर येथील निजामी हॉटेलजवळ राहत आहेत.
मुलांमध्ये किरकोळ भांडणावरून वाद झाला. बुधवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मुस्ताक आणि इस्लामुद्दीन यांची लहान मुले एकत्र खेळत होती. त्यावेळी मुलांमध्ये किरकोळ भांडणावरून वाद झाला होता. याच वादातून साहिलने इस्लामुद्दीन आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ करून इस्लामुद्दीनसोबत बाचाबाची करत असतानाच मुस्ताकनेही त्या ठिकाणी येऊन इस्लामुद्दीनला शिवीगाळ केली.
लोखंडी पाईपने डोक्यात वार
दरम्यान, भांडण सुरू असताना साहिलने घरातील लोखंडी पाईपने इस्लामुद्दीनच्या डोक्यात मारून मुस्ताकनेही हाताच्या ठोश्या बुक्क्यांनी मारहाण करून इस्लामुद्दीनला गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात बापलेकाच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण केल्याचा प्रकार
हिंजवडीमधील लक्ष्मी चौकाजवळ सार्वजनिक ठिकाणी तिघेजण आरडाओरडा करत असल्याने त्यांना समजवण्यासाठी हिंजवडी पोलीस गेले. त्यावेळी तिघांनी एका पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शुक्रवारी (२ मे) रात्री घडली आहे.