पिंपरीत एका व्यक्तीची सात कोटींची फसवणूक (फोटो- istockphoto)
पिंपरी: एका व्यक्तीला त्याच्या वरिष्ठांच्या नावाने व्हाट्स अप मेसेज आणि ईमेल करून पैसे पाठवण्यास भाग पाडले. यामध्ये व्यक्तीची तब्बल सात कोटी १६ लाख ४३ हजार ३६ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २४ मार्च ते २३ एप्रिल या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरात घडली.
या प्रकरणी पीडित व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार +49 1636814985, +33 7578121507 हे क्रमांक धारक आणि 9550880238736200481 हा अकाउंट धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्टीफन ईटर आणि ख्रिस्तोफ बेरगॉट या नावाने स्वतःला सीईओ आणि केपीएमजी कायदे सल्लागार असल्याचे भासवून फिर्यादी यांना व्हाट्स अप मेसेज व ईमेल केले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या कंपनीला विदेशात गुंतवणूक करायची असल्याचे सांगितले. त्यासाठी फिर्यादीकडून सात लाख ३८ हजार ५८८ युरो (भारतीय चलनात सात कोटी १६ लाख ४३ हजार ३६ रुपये) पाठवण्यास भाग पाडत त्यांची फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करीत आहेत.
सायबर चोरट्यांकडून तरुणांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र कायम असून, सायबर चोरट्यांनी दोन घटनांत दोघांची ४५ लाख रुपयांची फसवणूक केली. खराडी भागातील तरुणाची ३६ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत ३२ वर्षीय तरुणाने खराडी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. चोरट्यांनी तरुणाला एका ग्रुपमध्ये अॅड केले. तिथे गुंतवणूकीची माहिती दिली. तरुणाचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याला ३६ लाख ५५ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण तपास करत आहेत. हडपसर भागातील तरुणाचीही अशाच प्रकारे ८ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने वानवडी पोलिसांत तक्रार दिली.
क्रेडिट कार्ड अपडेट करण्याची बतावणी
क्रेडिट कार्ड अपडेट करण्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी तरुणाची ३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत २७ वर्षीय तरुणाने वाघोली पोलिसांत तक्रार दिली आहे. तरुण खासगी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरतो. चोरट्यांनी तरुणाला संपर्क साधला. बँकेकडून क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची माहिती गोळा केली जात आहे. तसेच, त्यांचे क्रेडिट कार्ड अपडेट केले जात असल्याचे सांगितले. त्यानूसार तरुणाकडून बँक खात्याची गोपनीय माहिती व क्रेडिट कार्डचा पासर्वड मिळवला. तसेच, त्याच्या खात्यातून ३ लाख ८० हजार रुपये स्वत:च्या खात्यात हस्तांतरित केले. वरिष्ठ निरीक्षक पंडित रेजितवाड तपास करत आहेत.