पैशाच्या व्यवहारातून पेरले येथे गोळीबार
उंब्रज : पैशाच्या व्यवहाराच्या वादातून एका तरुणावर पिस्तुलातून दोन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना कराड तालुक्यातील पेरले गावच्या हद्दीत इंदोली पुलाजवळील पाणंद रस्त्यावर घडली. या घटनेत संतोष शंकर घोलप (वय ३७, मूळ रा. कालगाव, ता. कराड, सध्या रा. उंब्रज) हे दोन्ही पायांना गोळ्या लागून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात सोमनाथ रमेश चव्हाण (रा. कालगाव, ता. कराड) व योगेश सुदाम दीक्षित (रा. मसूर, ता. कराड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पेरले गावच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिती उंब्रज पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून, पाटणचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक सुदाम पाचूरे तसेच उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार, तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने पाहणी केली.
याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष घोलप यास संशयित आरोपी सोमनाथ चव्हाण याने फोन करून पैशाचा व्यवहार मिटविण्यासाठी इंदोली पुलाजवळील पाणंद रस्त्यावर बोलावले होते. तेथे सोमनाथ चव्हाण व त्याच्यासोबत असलेल्या योगेश दीक्षित यांनी फिर्यादीस शिवीगाळ व धमकावून फॉर्च्युनर (क्रमांक MH-50-0222) या वाहनातून पिस्तूल काढले. त्यानंतर सोमनाथ चव्हाण याने जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीवर दोन राऊंड गोळीबार केला. गोळ्या चुकविण्याचा प्रयत्न करताना त्या फिर्यादीच्या उजव्या व डाव्या पायाला लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
घटनेनंतर जखमी संतोष घोलप यास त्याच्या सोबत असलेल्या दोघांनी उपचारासाठी कराड येथील सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा जबाब नोंदवून उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, जिल्हाधिकारी सातारा यांनी ९ जुलै ते २२ जुलै या कालावधीत सातारा जिल्ह्यात शस्त्रबंदी आदेश लागू केला असतानाही आरोपींकडून पिस्तुलाचा वापर करण्यात आल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गतही स्वतंत्र कलमे लावण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
आरोपींच्या शोधात पोलीस पथके रवाना
गोळीबारातील जखमी संतोष घोलप याची फिर्याद नोंदवल्यानंतर उंब्रज पोलिसांनी आरोपींच्या शोधात पोलीस पदके रवाना केली आहेत. यातील संशयित आरोपी सोमनाथ चव्हाण हा कालगावचा प्रशासक (सरपंच) आहे तर संशयित योगेश दीक्षित हाही मसूर परिसरातील एका राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.






