गुरुवारी रात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास सीवूड सेक्टर-१५ परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर एनआरआय सागरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान मृत तरुणाच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाचे घाव आढळून आले. प्राथमिक तपासात जड वस्तूने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांच्या चौकशीत संबंधित तरुण हा परिसरातील एका पडीक इमारतीत वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली. त्या इमारतीत पोलिसांना त्याचा पांढरा शर्ट सापडला. शर्टच्या खिशाची झडती घेतली असता अमली पदार्थांच्या सेवनासाठी वापरले जाणारे व्हाइटनर आढळून आले. त्यामुळे तो नशेच्या आहारी गेला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्याचा आणि हत्येचा थेट संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हत्या घटनास्थळीच झाली की अन्यत्र करून मृतदेह तेथे आणण्यात आला, याचाही तपास सुरू आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ, सेंट्रल युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे तसेच एनआरआय सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांनी भेट देऊन फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुरावे संकलित केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिकांची चौकशी करून आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, नवी मुंबईतील काही पडीक इमारती आणि ओसाड जागांवर नशेखोरांचा वावर वाढल्याच्या तक्रारी यापूर्वीही स्थानिकांकडून करण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर अशा ठिकाणी नियमित पोलीस गस्त वाढविणे, सुरक्षा उपाययोजना बळकट करणे आणि बेकायदा वास्तव्यास आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा पुढे येत आहे. एनआरआय सागरी पोलीस मृत तरुणाची ओळख पटविणे, हत्येमागील नेमका हेतू आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी सर्व बाजूंनी तपास करत आहेत.






