संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात घरपे फोडून चोरी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसही प्रयत्न करत आहेत. पुणे शहरातही घरफोड्यांचे सत्र कायम असताना सिंहगड रोड पोलिसांच्या तपास पथकाने मोठी कारवाई केली आहे. घरफोड्या करणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला सिंहगड रोड पोलिसांनी बेड्या ठोकत त्याच्याकडून ८ गुन्ह्यांची उकल केली आहे. त्याने घरफोडीतील चोरीच्या पैशांमधून एक कार देखील खरेदी केली असल्याचे तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून कारसह १४ लाख ७५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
सिंहगडमधील चार घटना
रेवण उर्फ रोहन बिरू सोनटक्के (वय २४, रा. दिघी, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून सिंहगडमधील चार, उत्तमनगरमधील दोन आणि विमानतळ व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक अशा ८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, देवा चव्हाण, राहुल ओलेकर, निलेश भोरडे, गणेश झगडे, समीर माळवदकर व त्यांच्या पथकाने केली आहे.
पुणे शहरात चोरट्याचा धुमाकूळ
पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सिंहगड रोड परिसरातील आनंददनगर भागात देखील एक बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. गुन्ह्याचा तपास सुरू होता. उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व त्यांचे पथक चोरट्यांची माहिती काढत होते. पोलिसांनी या भागातील सर्व सीसीटीव्ही पडताळले. यामधून चोरट्याची माहिती घेत असताना पोलिस अंमलदार देवा चव्हाण, राहुल ओलेकर, निलेश भोरडे यांना माहिती मिळाली की, घरफोडी करणारा आरोपी हा दिघी रोड परिसरात थांबलेला आहे. पथकाने लागलीच या भागात सापळा रचून पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली. त्याच्याकडे सखोल तपास केल्यानंतर त्याने आणखी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. एका घरफोडीतून चोरलेल्या पैशांमधून त्याने आलिशान कार खरेदी केल्याचेही समोर आले. पोलिसांनी ती देखील जप्त केली.
रेकॉर्डवरील गुन्हेगार
रेवण उर्फ रोहन हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापुर्वीचे तब्बल १७ गुन्हे दाखल आहेत. पुण्यासह तो कोल्हापूर, नवी मुंबई, पुणे ग्रामीण या भागात देखील घरफोडीचे गुन्हे करत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, तो पोलिसांच्या कस्टडीतून पळून देखील गेल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे.