सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा धडाका (Photo Credit- AI)
गावडेवाडी येथील महादेव कोरे यांच्या जागेतील रामदेव डेअरी येथे कोणताही अधिकृत परवाना न घेता हा व्यवसाय सुरू असल्याचे तपासात उघड झाले. अन्नसुरक्षा अधिकारी रामानंद स्वामी आणि रेणुका पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. शुद्ध दूध किंवा खव्यापासून बर्फी तयार करणे अपेक्षित असताना दुधातील स्निग्धांश काढून त्याऐवजी वनस्पती तूप वापरून मिठाई तयार केल्याचे समोर आले. ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी या मिठाईला खऱ्या बर्फीसारखे स्वरूप देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा कायदा कलम २६ आणि २७ अंतर्गत ही कारवाई केली. यामध्ये १६३ किलो अजमेरी बर्फी (किंमत २९ हजार ३४० रुपये) आणि ३४८ किलो गोड बर्फी (किंमत ६२ हजार ६४० रुपये) असा एकूण ५११ किलो मिठाईचा साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. तसेच मिठाई तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी स्किम्ड मिल्क पावडर आणि वनस्पती तूपही जप्त करण्यात आले.
थोडी बर्फी किंवा खवा घेऊन त्यात टिंचर आयोडीनचे दोन थेंब टाका. रंग निळा झाल्यास त्यात पिठाची भेसळ असण्याची शक्यता असते. बर्फी हातावर चोळल्यास ती दाणेदार न वाटता गुळगुळीत आणि मेणासारखी वाटत असल्यास त्यात वनस्पती तूप किंवा पामतेलाची भेसळ असू शकते. अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार मिठाई दुकानांमध्ये ट्रेमध्ये ठेवलेल्या मिठाईवर ती कधीपर्यंत खाण्यास योग्य आहे, याची माहिती देणे दुकानदारांना बंधनकारक आहे.






