आमदार सोपल यांच्या घरावर मध्यरात्री हल्ल्याचा प्रयत्न; ८ जणांविरोधात गुन्हा, पेटते फटाके फेकून आग लावण्याचा आरोप
बार्शी प्रतिनिधी : बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या आगळगाव रोडवरील निवासस्थानावर पेटते फटाके व स्फोटके फेकून आग लावण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे घडली. या प्रकरणी आठ जणांविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत आमदार सोपल यांचे बंधू सुधीर गंगाधर सोपल (वय ७८) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, मंगळवारी पहाटे सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या निवासस्थानी झोपले असताना घराच्या पाठीमागील बी.टी.एम. पॅव्हेलियन मैदानाच्या दिशेने पेटते फटाके घराच्या परिसरात येऊन पडू लागले. मोठ्या आवाजामुळे जाग आल्यावर त्यांनी खिडकीतून पाहिले असता परिसरातील काही झाडांना आग लागल्याचे दिसून आले.
त्यानंतर कर्मचारी गुरुपादय स्वामी यांच्यासह परिसराची पाहणी केली असता दोन व्यक्ती कंपाउंड ओलांडून घराच्या आवारात प्रवेश करून पेटते फटाके टाकत असल्याचे दिसल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. यामध्ये नाथा मोहिते व योगेश लोढे यांची ओळख पटल्याचे नमूद करण्यात आले आहे. आपण पाहत असल्याचे लक्षात येताच दोघेही शिडीच्या साहाय्याने कंपाउंड ओलांडून पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
शिर्डीत शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप; संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
दरम्यान, कर्मचारी गुरुपादय स्वामी यांचा मुलगा ओंकार स्वामी याने कंपाउंडच्या बाहेर पाहणी केली असता काही व्यक्ती बाहेरूनही पेटते फटाके घराच्या दिशेने फेकत असल्याचे दिसले. घटनास्थळी एक रिक्षा व तीन दुचाकी उभ्या असल्याचेही निदर्शनास आले.
या घटनेत घराच्या परिसरातील आंबा, जांभूळ व बाबूळची झाडे जळून खाक झाली. तसेच सोलर पॅनलला तडे जाऊन सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
या प्रकरणी नाथा मोहिते, योगेश लोढे, आशिष शिंदे, कुणाल खंदारे, राज देवकुळे, पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते आणि आंबादास रणझुंजारे यांच्याविरोधात जिवीतास धोका निर्माण करणे, स्फोटकांच्या साहाय्याने राहते घर जाळण्याचा प्रयत्न करणे व मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बार्शी शहर पोलीस करीत आहेत.
अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड बैठकीनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी घडामोड






