Terrorist Arrested: कुख्यात दहशतवादी 'हुझैफा' जेरबंद; ३ दिवसांचे सर्च ऑपरेशन यशस्वी
Terrorist Arrested: मुंबईत दहशतवादी हल्ला आणि घातपाताचा कट उधळून लावण्यात तपास यंत्रणांना मोठे यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला ‘हुझैफा’ हा कुख्यात दहशतवादी तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकला आहे. मुंबई पोलिसांच्या तपास यंत्रणांचे हे मोठे यश मानले जात आहे. त्याचबरोबर मुंबई पुन्हा एका मोठ्या संकटातूनही वाचल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मोठी कारवाई ‘महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक’ (Maharashtra ATS) आणि दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ने (Delhi Police Special Cell) अत्यंत गुप्तपणे आणि संयुक्तपणे केली आहे. हुझैफा हा देशाच्या राजधानीत आणि आर्थिक राजधानीत समांतरपणे कारवाया करण्याच्या तयारीत होता, मात्र तपास यंत्रणांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा डाव पुरता उधळला गेला आहे.
दहशतवादी हुझैफा हा अत्यंत हुशारीने आणि वारंवार आपले ठिकाण बदलून पोलिसांना चकवा देत होता. त्याचे गांभीर्य ओळखून त्याला पकडण्यासाठी गेल्या ३ दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात विविध संशयास्पद ठिकाणी कसून छापे टाकले जात होते. एटीएस आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकांनी रात्रंदिवस राबवलेल्या या धडाकेबाज शोधमोहिमेनंतर (Search Operation) अखेर ३ व्या दिवशी हुझैफाला मुंबईच्या एका भागातून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
हुझैफाच्या अटकेमुळे अंडरवर्ल्ड आणि परदेशी दहशतवादी संघटनांचे मुंबईतील नेटवर्क पुन्हा एकदा समोर आले आहे. हुझैफाला मुंबईत कोणी आश्रय दिला होता? त्याच्याकडे कोणती शस्त्रे किंवा स्फोटके आली होती का? आणि मुंबईत कोणती ठिकाणे त्याच्या निशाण्यावर होती? या सर्व बाबींचा शोध घेण्यासाठी पोलीस आता त्याची कसून चौकशी करत आहेत. या चौकशीतून अनेक मोठे खुलासे होण्याची आणि इतर काही संशयितांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
या दहशतवादी कटामागचे एक धक्कादायक कारणही समोर आली आहे. मुंबईत रेल्वेच्या जागेवर झालेले एक अतिक्रमण हटवण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्रशासनाने मोठी कारवाई केली होती. याच अतिक्रमण हटाव कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी आणि रेल्वे परिसरामध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचे नियोजन केले होते. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, हा संपूर्ण कट पाकिस्तानातील कराचीतून एक मुख्य सुत्रधार ऑपरेट करत होता. असेही तपासातून समोर आले आहे
भारतात अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत आहेत. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, मुन्ना झिंगाडा हा या नेटवर्कचा प्रमुख हँडलर असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या सूचनेनुसार आरोपी हुझैफावर मुंबई आणि परिसरात स्थानिक स्तरावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना एकत्र करणे, तरुणांचे कट्टरपंथीकरण करणे आणि घातपाती कारवायांसाठी आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.






