सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : एक मोठी बातमी समोर आली आहे. लोहगडावर झालेल्या व्यावसायिक केतन अगरवाल खून प्रकरणाला शनिवारी (१८ जुलै) रोजी एक महिना पूर्ण झाले आहे. हत्या करणारा चेतन चौधरी तसेच होणारी पत्नी सिया गोयल सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून, भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
केतन अगरवाल या तरुण व्यावसायिकाचा १८ जून रोजी लोहगडावरून दरीत ढकलून खून केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर देशभरात चर्चा झाली. तो पाय घसरून पडला, असा दावा सिया गोयल हिने केला होता. मात्र, पुणे ग्रामीण पोलिस तसेच कुटुंबियांनी केलेल्या संशयावरून या खूनाचा उलगडा झाला. त्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. देशभरातील प्रसारमाध्यमांनी या घटनेची दखल घेतली.
या प्रकरणी केतनची नियोजित पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना न्यायालयीन कोठडी दिली असून, ते सध्या येरवडा कारागृहात आहेत. केतन अगरवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतन यांनी सोशल मिडीयावर मर्डर मेथड्स माहिती शोधल्याचे पोलिस तपासात उघड झाले. सिया केतनला घेऊन १४ जूनला लोहगडावर गेली असताना, तिने केतनला दरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे तिने चेतनची मदत घेतली, अशी माहिती तपासात मिळाली होती. केतनच्या खुनापूर्वी सिया आणि चेतन हे एका कॅफेमध्ये भेटले होते. तेथे त्यांनी केतनला मारण्याचा कट रचला होता. नंतर दोघांनी कोंढव्यातील लुल्लानगरमधील मोकळ्या जागेत केतनला कशा पद्धतीने मारायचे, याबाबतचा सराव केला होता. ‘सिया आणि चेतन हे कोडवर्डमध्ये बोलत होते.
पोलिसांकडून न्यायवैद्यकीय अहवाल, तांत्रिक पुरावे, घटनास्थळाची पुर्नरचना (सीन रिक्रएशन), तसेच अन्य तांत्रिक बाबी विचारात घेऊन केतन अगरवाल खून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. सीसीटीव्ही चित्रीकरण, मोबाइलची तांत्रिक पडताळणी, मोबाइलमधील चॅट तसेच अन्य बाबींवर तपासात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. केतन अगरवाल खून प्रकरणाचा तपास अंतिम टप्यात आला आहे,’ अशी माहिती ग्रामीण पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.






