ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक आणि युनिट एकाच्या पथकाने दोन वेगवेगळ्या मोठ्या कारवाई केली आहे. या कारवायांमधून तब्बल एकूण ३ कोटी ९७ लाख रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या इरफान अमानूल्लाह शेख आणि शाहरुख सत्तार मेवासी उर्फ रिजवान या दोघांना अटक करण्यात आली आहे.
Latur News: पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे पतीने उचलले टोकाचे पाऊल; अनेक वर्षांपासून होते प्रेम संबंध
ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाला एक व्यक्ती एमडी ड्रग्ज विक्री करण्यासाठी डायघर परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, २७ जुलै रोजी सायंकाळी शिळफाट्याकडून दिवागावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस पथकाने सापळा रचला. एका फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांना संशय आला. त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता, त्याच्याकडे 1 किलो 522 ग्रॅम एमडी म्हणजेच मेफेड्रोन हे ड्रग्ज आढळून आले. हे ड्रग्ज एकूण 3 कोटी 4 लाख 71 हजार रुपयांच्या किमतीचे होते. पोलिसांनी हे ड्रग्स जप्त केले आणि डिलिव्हरी बॉय इरफान अमानूल्लाह शेख याला अटक केली.पोलिसांनी इरफान अमानूल्लाह शेख याच्याविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने त्याला ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुसरी मोठी कारवाई
ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ जुलै रोजी केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण 92 लाख 68 हजार रुपये किंमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. एक तस्कर भिवंडी- मुंब्रा रस्त्यावर एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट एकच्या पथकास मिळाली होती. या माहितीनुसार, पोलिसांनी भिवंडी-मुंब्रा रस्त्यावर खारेगाव टोल नाक्याजवळ सापळा रचला आणि एका कार चालवणाऱ्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले.
त्याच्या कारची झडती घेतली असता, त्यामध्ये 662 ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले. 92 लाख 68 हजार रुपये किंमत असलेले हे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आणि ड्रग्ज तस्कर शाहरुख सत्तार मेवासी उर्फ रिजवान (28, मंदसौर, मध्य प्रदेश) याला अटक केली. न्यायालयाने त्याला 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.