सांगली : जत तालुक्यातील डफळापूर येथे दोन दिवसांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रच्या (BOI) एटीएमवर दरोड्याचा (ATM Robbery) प्रयत्न झाला. या एटीएम फोडीचा सूत्रधार पोलीस हवालदार (Police Constable) असल्याची माहिती आता पोलिसांच्या तपासातून (Police Inquiry) पुढे आली आहे. जत पोलिसांनी मुख्य सूत्रधार कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील सचिन यशवंत कोळेकर या कर्मचाऱ्यासह सुहास मीरासाहेब शिवशरण या साथीदाराला अटक (Arrest) केली आहे.
मुख्य रस्त्यावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम सेंटर मध्यरात्रीच्या सुमारास फोडून दरोड्याचा प्रयत्न झाला होता. एटीएम मशीन ओढून बाहेर काढण्यात आले होते. ते पळवून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांचा होता. मात्र, अवजड मशीन उचलता न आल्याने ते रस्त्यावरच टाकून चोरट्यांनी पलायन केले. सोमवारी या प्रकरणाचा छडा लागला. तपासामध्ये कवठेमहाकाळ पोलिसात कार्यरत असलेला आणि मूळचा जत तालुक्यातील रामपूर येथील सचिन यशवंत कोळेकर हाच या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गाडी भाड्याने घेऊन रेकी करून, एटीएममध्ये चोरीचा प्लॅन कोळेकरने केला. मात्र, एटीएम जड असल्याने ते तेथेच टाकून पळून गेला. सांगली जिल्ह्यात या आठ महिन्यांत चौथ्यांदा एटीएम मशीन फोडण्याची ही घटना घडली आहे.