संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या अत्याचारानंतर संबंधित आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला होता. अखेर पुणे पोलिसांनी या नराधमला बेड्या ठोकल्या आहेत. अत्याचार प्रकरणात पुणे पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पुढील १५ दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
आरोपीला पोलीस कोठडी
या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. पुणे) याला पोलिसांनी तत्काळ अटक केली होती. न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास असल्याचे समोर आले आहे. चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंगसारख्या गुन्ह्यांमध्ये तो आधीही अडकला होता.
पोलिसांचा जलद तपास आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरू
पोलिसांकडून आरोपीविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक अहवाल आणि पीडितेचे जबाब यांचा तपशीलवार अभ्यास केला जात आहे. आरोपीविरोधात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करून कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाची दखल
या घटनेनंतर राष्ट्रीय महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून तपास अहवाल आणि फिर्यादीची प्रत तीन दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
एसटी स्थानकातील सुरक्षेची उपाययोजना
या घटनेनंतर एसटी प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वारगेट स्थानकात अतिरिक्त ३६ सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार असून, त्यामध्ये सहा महिला सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. तसेच, शिवाजीनगर एसटी स्थानकातील काही सुरक्षारक्षकांचीही बदली स्वारगेट येथे करण्यात आली आहे.
पीडितेसाठी जलदगती न्यायाची अपेक्षा
स्वारगेट एसटी स्थानकात घडलेल्या या अमानुष घटनेनंतर संपूर्ण शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी जलदगतीने तपास करून आरोपीविरोधात पंधरा दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचा निर्णय घेतल्याने पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्वारगेटचा भाग व बसस्थानक कायम धोकादायकच
स्वारगेट बसस्थानकाच्या आवारातील बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने पुन्हा येथील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असून, स्वारगेटचा परिसर आणि बसस्थानक कायमच धोकादायक असल्याचे आतापर्यंत झालेल्या एकूण घटना आणि केलेल्या पाहणीतून दिसून आले आहे. कारण, सातत्याने या परिसरात लुटमार, मोबाईल हिसकावणे, चोऱ्या अशा घटना घडतात. तर, बसस्थानकाच्या आवारात प्रवाशांचे मौल्यवान वस्तू चोरीच्या घटना घडल्या आहेत. विशेषत: या भागात गुन्हेगारांचा वावर रात्री मोठ्या प्रमाणातच असतो, रात्री-अपरात्री रिक्षा चालक बहुतांश हे गुन्हेगार असल्याचे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार समजते.