सौजन्य - सोशल मिडीया
शिक्रापूर : पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांमुळे पोलिसांसह नागरिकही हैराण झाले आहेत. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता शिक्रापूरसह परिसरात वारंवार मोबाईल चोरीच्या घटना घडत असताना नुकतेच मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या दोन मोबाईल चोरांना भगवान थोरवे या युवकाने तब्बल एक किलोमीटर पाठलाग करत पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
याबाबत परशराम दुर्गाप्पा वडर (वय ४७ रा. करंजेनगर शिक्रापूर ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी प्रसाद संतोष भोंडवे (वय १९ रा. डोंगरवस्ती सणसवाडी ता. शिरुर) याच्यासह त्याच्या अल्पवयीन साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बाजार मैदान जवळ परशराम वडर हे मोबाईल हातात घेऊन उभे होते. यावेळी दुचाकीहून आलेल्या दोघांनी परशराम यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. ही घटना पाहिलेल्या भगवान थोरवे याने सदर दुचाकीस्वारांचा पाठलाग केला. तब्बल एक किलोमीटर अंतर गेल्यावर शिताफीने दुचाकीस्वारांना धक्का दिल्याने दोघांच्या दुचाक्या घसरल्या. मात्र यावेळी दोघे चोरटे पळून जाऊ लागले. तेव्हा भगवानने एकाला शिताफीने पकडले मात्र एकजन दुचाकी घेऊन पळून गेला.
याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, लहानू बांगर, जयराज देवकर यांनी घटनास्थळी धाव घेत पकडलेल्या प्रसाद भोंडवेला ताब्यात घेतले. मात्र त्याचा अपल्वयीन साथीदार पळून गेला. पोलिसांनी त्याला देखील चोरीच्या मोबाईलसह ताब्यात घेतले. दरम्यान भगवान थोरवेच्या धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे.