तिहेरी हत्याकांडाचा उलगडा (फोटो- istockphoto)
शिक्रापूर: शिक्रापूर खंडाळे ता. शिरुर येथे पुणे नगर महामार्गालगत घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने पुणे जिल्हा हादरून गेला होता. दोन चिमुकल्या मुलांसह एका तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असताना पंधरा दिवसांच्या अथक तपासानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून तपासात मोठे यश मिळवले आहे.
खंडाळे ता. शिरुर येथे २३ मे रोजी आरोपी गोरख पोपट बोखारे वय ३६ वर्षे सध्या रा. सरदवाडी, ता. शिरूर जि. पुणे, मूळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर याने मृत महिला स्वाती केशव सोनवणे वय २५ वर्षे रा. वाघोरा, ता. माजलगाव, जि. बीड आणि तिचे दोन मुले स्वराज वय ४ वर्षे व विराज वय २ वर्षे यांना आळंदी येथून आपल्या दुचाकीवरून घेवून गेला.
दरम्यान रात्रीच्या सुमारास येथील ग्रोवेल कंपनीजवळच्या निर्जन स्थळी त्याने थांबून तिघांनाही गळा आवळून व दगडाने डोक्यात मारून निर्दयीपणे ठार मारले. गुन्हा लपवण्यासाठी त्याने मृतदेहांना पेट्रोल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला.
मृत स्वाती सोनवणे ही बीड जिल्ह्यातील असून ती आरोपीच्या भावाची पत्नी होती. म्हणजेच आरोपी गोरख बोखारे हा तिचा दीर ठरत आहे. पोलीस तपासानुसार पीडितेने दुसरे लग्न करण्याच्या इच्छेचा विरोध आरोपीने केल्यामुळे त्याने ही क्रूर कृत्य केली. या हत्याकांडानंतर पुणे ग्रामीण पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी पुणे, बीड, नगर या जिल्ह्यांमध्ये व्यापक तपास करून आरोपीचा माग काढला.
या तपासासाठी विविध पथकांनी एकजुटीने काम करत, तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फूटेज, स्थानिक माहिती यांचा आधार घेतला आणि अखेर आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. या गुन्ह्याच्या उकलीसाठी विशेष मेहनत घेतलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पुढील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार, एस.डी.पी.ओ. प्रशांत ढोले, बापूराव दडस, पोनि. अविनाश शिळीमकर, पोनि. महादेव वाघमोडे, विश्वास जाधव, दत्ताजीराव मोहिते, पोसई अविनाश थोरात, सविता काळे, महेश डोंगरे, दीपक साबळे, तुषार पंदारे आणि त्यांच्या टीम्स. या विशेष तपासात पोलीस शिपायांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जवळपास ५० हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदारांनी दिवस-रात्र एक करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
सध्या आरोपीला रिमांडवर घेतले असून पुढील तपास सुरु आहे. या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर विविध अंगांनी चौकशी केली जात आहे. पोलिसांकडून गुन्ह्याच्या पार्श्वभूमीतील सामाजिक, कौटुंबिक आणि मानसिक स्थितीचा अभ्यास केला जात आहे.
ही घटना केवळ क्रौर्याची परिसीमा नव्हे तर सामाजिक चेतनेला हादरवणारी आहे. एखादी महिला आणि तिच्या निष्पाप मुलांवर असा अमानुष अत्याचार करणारा तिचाच नातेवाईक असावा, ही बाब मन सुन्न करणारी आहे. परंतु या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी दाखवलेली तत्परता, संयम आणि कसून तपासाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.